काँग्रेसला आयकर विभागाकडून १८२३ कोटींची नोटीस

 काँग्रेसला आयकर विभागाकडून १८२३ कोटींची नोटीस

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकांची मोर्चे बांधणी करण्यासाठी देशातील विविध पक्ष पूर्ण ताकदीसह कामाला लागलेले असताना काँग्रेस पक्षाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय तपास यंत्रणांकडून काँग्रेसची बँक खाती सील करण्यात आली होती. त्यामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसला आज अजून एक झटका बसला आहे. आयकर विभागाने पक्षाला पुन्हा नोटीस पाठवली असून १८२३.०८ कोटी रुपये भरण्यास सांगितल्याचे शुक्रवारी काँग्रेसने स्पष्ट केले. ही नोटीस २०१७-१८ ते २०२०-२१ साठी पाठवली आहे.

यामध्ये कर, दंड आणि व्याज जोडलेले आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी भाजप ‘कर दहशतवादा’चा आधार घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी भाजपवर टीका केली.

जयराम रमेश म्हणाले , भाजप स्वत: आयकर कायद्यांचे उल्लंघन करत आहे. भाजपने निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्यात ८२०० कोटी जमवले. आमच्या आमदार-खासदारांनी १४ लाख रोकड जमा केली. म्हणून त्यांना १३५ कोटींचा दंड मागितला जात आहे. भाजपला २०१७-१८ मध्ये १२९७ जणांनी नाव-पत्ता न सांगता ४२ कोटी दिले. परंतु विभागाने या बेहिशेबी रकमेसाठी भाजपला ४६०० कोटींच्या दंडाची नोटीस पाठवली नाही. केवळ विरोधी पक्षाच्या विरोधात अयोग्य कारवाईसाठी आयकर विभागावर कोण दबाव टाकत आहे? काँग्रेसची याचिका फेटाळल्याच्या दुसऱ्याच दिवशी नवी नोटीस दिली. याविरुद्ध काँग्रेस शनिवारी देशभर निदर्शने करणार आहे.

याबाबत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, सरकार बदलल्यास ‘लोकशाहीचे वस्त्रहरण ’ करणाऱ्यांवर आमच्याकडून निश्चित कारवाई केली जाईल. पुन्हा असे करण्याची हिंमत होणार नाही अशी कारवाई करू. ही माझी हमी आहे.

यावर भाजप प्रवक्ते जफर इस्लाम यांनी “आयकर विभाग व न्यायसंस्थेवर आरोप लावण्याऐवजी काँग्रेसने कायद्याचे पालन करावे. नियमांतून सूट मिळावी, असे काँग्रेसच्या एका परिवारास वाटते…आधुनिक भारतात हे शक्य नाही.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

SL/ML/SL

30 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *