नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर कुंभमेळ्याला निघालेल्या भाविकांच्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली स्थानकावर जमलेल्या हजारो भाविकांच्या गर्दीमध्ये काल रात्री साडेनऊच्या सुमारास मोठी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये आत्तापर्यंत १८ लोकांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांना दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात आणण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश मृतदेहांच्या छातीवर आणि पोटावर जखमा होत्या. त्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.
नवी दिल्ली स्थानकावरून प्रयागराजला जाण्यासाठी सुटणारी रेल्वे अपेक्षित फलाटावर न येता दुसऱ्या फलाटावर लावण्यात आल्यामुळे ती ट्रेन पकडण्यासाठी लोकांची धावपळ झाली आणि त्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात प्लॅटफॉर्म क्रमांक १३, १४ आणि १५ दरम्यान झाला.रात्री ८.३० च्या सुमारास, प्रयागराजला जाणाऱ्या ३ गाड्या उशिराने धावल्या, ज्यामुळे गर्दी वाढली. प्रत्यक्षदर्शीनुसार, ट्रेनचा प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून १६ करण्यात आला. यामुळे चेंगराचेंगरी झाली.
अपघाताच्या चौकशीसाठी दोन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात उत्तर रेल्वेचे दोन अधिकारी नरसिंग देव आणि पंकज गंगवार यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीने नवी दिल्ली रेल्वे स्थानकाचे सर्व सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज सुरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी २९ जानेवारी रोजी प्रयागराजच्या महाकुंभात ३० जणांचा मृत्यू झाला होता.
SL/ML/SL
16 Feb. 2025