इंदौरमध्ये दूषित पाण्यामुळे १७ जणांचा मृत्यू

 इंदौरमध्ये दूषित पाण्यामुळे १७ जणांचा मृत्यू

इंदौर,दि. ५ : देशातील सर्वांत स्वच्छ शहर अशी ख्याती असलेल्या इंदौरमध्ये दुषीत पाण्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. इंदौरच्या भागीरथपुरा येथे दूषित पाणी प्यायल्याने मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे. ताज्या घटनेत सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी ओमप्रकाश शर्मा (६९) यांचा मृत्यू झाला. त्यांना १ जानेवारी रोजी उलट्या-जुलाब झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु किडनी निकामी झाल्याने प्रकृती बिघडली आणि अखेर आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बॉम्बे रुग्णालयात दाखल असलेल्या ११ रुग्णांपैकी ४ जणांना वॉर्डमध्ये हलवण्यात आले असून ७ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ३९८ रुग्ण दाखल झाले होते, त्यापैकी २५६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १४२ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाने ४ जानेवारी रोजी २३५४ घरांचे सर्वेक्षण करून ९४१६ लोकांची तपासणी केली, ज्यात २० नवीन रुग्ण आढळले. ४२९ जुन्या रुग्णांचा फॉलोअप घेण्यात आला. बाधित क्षेत्रात ५ अ‍ॅम्ब्युलन्स तैनात असून प्रत्येक घरात १० ओआरएस पॅकेट, ३० झिंकच्या गोळ्या आणि क्लीन वॉटर किट वाटण्यात आले आहेत. १७ पथके लोकांना सतत जागरूक करत आहेत.

या प्रकरणी शासन मंगळवारी उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठात सविस्तर अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, कोलकाता, दिल्ली आणि भोपाळहून आलेले तज्ज्ञ डॉक्टर व वैज्ञानिक पथके भागीरथपुरा परिसरात तपासणी करत आहेत. कोलकात्याचे वैज्ञानिक डॉ. प्रमित घोष आणि डॉ. गौतम चौधरी पाण्याचे नमुने गोळा करून वैज्ञानिक तपासणी करतील.

पाइपलाइन दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून बोअरिंगमधील गळतीची तपासणी केली जात आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची सोय टँकरद्वारे केली जात आहे, तर मागणी वाढल्याने गल्लीबोळात बिसलरीच्या गाड्याही फिरू लागल्या आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *