विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी दावोस 2025 मधील 17 करारांना  मंजुरी

 विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी दावोस 2025 मधील 17 करारांना  मंजुरी

नवी दिल्ली 27 : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा निर्णय महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत एकूण ₹3,92,056 कोटी गुंतवणुकीच्या 17 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. या गुंतवणुकीतून राज्यात 1,11,725 प्रत्यक्ष आणि 2.5 ते 3 लाख अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागाला याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
यामुळे राज्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळाली असून राज्यात अनेक महत्त्वाच्या उद्योग प्रकल्पांना सरकारकडून मंजूरी मिळाली आहे. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. या गुंतवणुकीमुळे राज्यात हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी आणि मिहान या औद्योगिक क्षेत्रांमध्ये सौर ऊर्जा आणि लिथियम बॅटरी उत्पादन प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. पावर इन एनर्जी इंडिया कंपनी बुटीबोरी येथे सौर ऊर्जा उपकरणांसाठी 15,299 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 4,500 लोकांना रोजगार मिळणार आहे. तसेच, वर्धन लिथियम कंपनी नागपुरात लिथियम बॅटरी आणि रिफायनरी प्रकल्पासाठी 42,532 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे 6,000 लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून बुटीबोरी येथे लिथियम आयरन फॉस्फेट बॅटरी उत्पादनासाठी 20,941 कोटींची गुंतवणूक केली जात आहे, यामुळे 7,000 रोजगार निर्माण होतील. याशिवाय, कंपनी सोलर पीव्ही वेफर आणि सेल उत्पादनासाठी 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, ज्यामुळे 6,900 लोकांना रोजगार मिळू शकेल. वारी एनर्जीज कंपनीही नागपुरात सौर ऊर्जा उपकरण निर्मितीमध्ये 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे आणि त्यामुळे तब्बल 15,000 लोकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

 स्टील क्षेत्रातही मोठ्या गुंतवणुकीला गती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनी 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असून मात्र, या प्रकल्पातून केवळ 2,500 रोजगारनिर्मिती होणार आहे. दुसरीकडे, लॉयड मेटल अँड एनर्जी कंपनी गडचिरोलीमध्येच 16,580 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यामुळे 3,500 लोकांना रोजगार मिळू शकेल. सुरजागड इस्पात कंपनीही गडचिरोलीमध्येच 9,230 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यामुळे 8,000 लोकांना नोकरीच्या संधी मिळतील.

रायगडमध्ये जिंदाल स्टेनलेस कंपनी 41,580 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असून, यामुळे 15,500 लोकांना रोजगार मिळणार आहे. भद्रावती (चंद्रपूर) येथे ग्रेटा एनर्जी कंपनी स्टील प्रकल्पासाठी 10,319 कोटींची गुंतवणूक करणार असून, 8,000 लोकांना रोजगार मिळणार आहे.

संरक्षण आणि एयरोस्पेस क्षेत्रातही मोठ्या  गुंतवणूकी बद्दल निर्णय झाले असून,  नागपुरात इकोनॉमिक एक्सप्लोसिव्ह सोलर डिफेन्स कंपनी 12,780 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवणार असून, 2,325 रोजगार उपलब्ध होतील. तसेच, पुण्यात एल अँड टी डिफेन्स कंपनी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, 2,500 लोकांना रोजगारच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्वी पॉवर इंडस्ट्रीज कंपनी लिथियम बॅटरी उत्पादनासाठी 10,521 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यामुळे 5,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नवी ऊर्जा वाहन निर्मितीमध्ये 14,377 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे, ज्यामुळे 4,000 लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत, जेनसोल इंजिनीअरिंग कंपनी 4-चाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनासाठी 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यामुळे 3,000 लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.

फार्मा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून, रिलायन्स लाइफ सायन्सेस कंपनी नाशिक आणि नवी मुंबई येथे 8,206 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे, ज्यामुळे 4,790 रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय, अहिल्यानगर येथे सायलॉन बेव्हरेजेस कॅन कंपनी कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्ससाठी अॅल्युमिनियम कॅनच्या उत्पादनासाठी 1,039 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे, ज्यामुळे 450 लोकांना नोकऱ्या मिळू शकतील.

या ऐतिहासिक निर्णयावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही गुंतवणूक महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला वेग देणारी आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याला यातून मोठी चालना मिळेल. यातून राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.” ही गुंतवणूक विदर्भ आणि मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला गती देणार असून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

VB/ML/SL 27March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *