नाकाबंदीत सुमारे १६ लाखांचा गुटखा जप्त

 नाकाबंदीत सुमारे १६ लाखांचा गुटखा जप्त

मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागपाडा परिसरात करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूचा मोठा साठा हस्तगत केला आहे. पोलिसांनी या गुटखा व वाहनासह एकूण १९ लाख ६ हजार ९३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एका इसमाला अटक केली आहे.

ही कारवाई नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. बाटा जंक्शन, क्लेअर रोड येथे सुरू असलेल्या नाकाबंदीदरम्यान पीकअप (छोटा हत्ती) क्रमांक एमएच ०३ डीव्ही ०८८५ या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदी घातलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूजन्य उत्पादने आढळून आली. वाहनचालकाकडे चौकशी करून त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

आरोपीचे नाव महेश निरंकार प्रसाद गुप्ता (वय ३४) असून तो साकीनाका परिसरातील रहिवासी आहे. त्याच्याकडून एकूण १९ लाख ६ हजार ९३६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये १५ लाख ८६ हजार ९३६ रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य माल आणि अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीचे पीकअप वाहन (छोटा हत्ती) जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २४७, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस शिपाई अजय मोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात असून पोलीस उप निरीक्षण धनंजय गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक राहुल कदम,
गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी उपनिरीक्षक धनंजय गायकवाड व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *