NEET मध्ये ग्रेस गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची होणार पुनर्परीक्षा
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET 2024 च्या निकालात झालेल्या गैरप्रकाराबाबत गेल्या आठवडाभरापासून आंदोलन करणाऱ्या परीक्षार्थींचा प्रयत्नांना आज यश आले आहे. या परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या 1 हजार 563 मुलांचे निकाल रद्द केले जाणार असल्याची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणी दरम्यान दिली आहे. तसेच, निकाल रद्द झालेल्यांना पुन्हा परीक्षा देण्याची मुभा सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे.
NEET निकालानंतर दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, ग्रेस गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. त्याचबरोबर समुपदेशनावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. NEET UG 2024 परीक्षेत ग्रेस गुण मिळालेल्या उमेदवारांची पुनर्परीक्षा 23 जून रोजी पार पडणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचं NTAच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
ग्रेस मार्क्स दिलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएनं दोन पर्याय दिले आहेत. हे विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसू शकतात किंवा त्यांच्या जुन्या गुणांसह समुपदेशनासाठी पुढे जाऊ शकतात.परंतु त्यांच्या स्कोअरकार्डमधून अतिरिक्त गुण काढून टाकले जातील. ज्या उमेदवारांना आपण पुनर्परीक्षेत चांगली कामगिरी करू शकतो,असा आत्मविश्वास आहे ते पुनर्परीक्षेला बसण्याचा निर्णय घेऊ शकतात. पुनर्परीक्षेचा निर्णय हा सर्वस्वी विद्यार्थ्यांचा असणार आहे. 23 जून रोजी पुन्हा परीक्षा (1563) होईल, त्यानंतर निकाल 30 जूनपूर्वी येऊ शकतो.
5 मे रोजी देशभरात NEET परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचं आयोजन करणाऱ्या NTA नं 4 जून रोजी निकाल जाहीर केला. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या निकालांवरुन देशभरात मोठा गदारोळ झाला. 67 मुलांना 720 पैकी 720 गुण मिळाले. तर सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, 1563 मुलांना ग्रेस मार्किंग देण्यात आलं. हे ग्रेस मार्किंग 10, 20 किंवा 30 गुणांसाठी नसून 100 ते 150 गुणांचं देण्यात आलं होतं, त्यामुळे मेरिटबाहेर असलेली अनेक मुलं मेरिटमध्ये आली आणि ज्या मुलांकडे गुणवत्ता आहे, त्यांना शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झालं होतं. आज अखेर या मुलांना न्याय मिळाला आहे.
SL/ML/SL
13 June 2024