नेपाळमध्ये भूकंपामुळे १५४ नागरिकांचा मृत्यू
काठमांडू, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेपाळमध्ये शुक्रवारी मध्यरात्री ६.४ रिश्टर स्केल एवढ्या प्रचंड तीव्रतेच्या भूकंपात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या दुर्घटनेत १५४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकून पडले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या दुर्घटनेत शेकडो लोक जखमी झाले आहे.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नेपाळच्या उत्तरी-पश्चिम जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. मृतांमध्ये रुकूम पश्चिम जिल्ह्यातील आणि जाजरकोट येथील लोकांचा समावेश आहे. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
दरम्यान, नेपाळमधील या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले. दिल्ली-एनसीआर, बिहार तसेच उत्तरप्रदेशातही जाणवले. भूकंपानंतर बिहारची राजधानी पाटणामध्ये लोक घराबाहेर पडले. पाटणा येथील एका व्यक्तीने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, अचानक त्याचा बेड आणि पंखा हालू लागला. भूकंप झाल्याचे लक्षात येताच ते तात्काळ घराबाहेर पडले.
नेपाळमधील या आपत्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केलं आहे. नेपाळमध्ये भूकंपामुळे (Earthquake) झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीमुळे आपण अत्यंत दु:खी आहोत, असं मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
भारत नेपाळच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे आणि शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. आमच्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत आणि आम्ही जखमींना लवकरात लवकर बरे व्हावं यासाठी प्रार्थना करतो, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात.
दरम्यान पुण्याहून नेपाळला पर्यटनासाठी गेलेले ३९ पर्यटक सुरक्षित आहेत. पुण्यातील पर्यटकांशी संपर्क न झाल्याने नातेवाईक चिंतेत होते. आज सकाळी पर्यटकांशी संपर्क झाल्यानंतर चिंताग्रस्त नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.
SL/KA/SL
4 Nov. 2023