केरळमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीदरम्यान 150 जखमी

कासारगोड, दि. २९ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात काल रात्री साडेबारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झालेल्या स्फोटामुळे १५० जण जखमी झाले. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या मंदिरातील वार्षिक कालियाट्टम उत्सवासाठी काल सुमारे दीड हजार भाविक मंदिरात जमले होते. त्यावेळी आतिषबाजीला सुरुवात झाली. या फटाक्यांच्या ठिणग्या फटाक्यांच्या गोदामापर्यंत पोहोचून तिथे स्फोट झाला. या गोदामात सुमारे २५ हजार रुपये किमतीचे फटाके ठेवण्यात आले होते.
या अपघाताप्रकरणी पोलिसांनी मंदिर समितीच्या दोन सदस्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. मंदिर समितीने फटाके फोडण्याचा परवानाही घेतला नव्हता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या स्फोटातील जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन गंभीर लोकांना परियाराम वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतर अनेकांना मंगळूर, कुन्नूर आणि कासारगोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
SL/ ML/ SL
29 October 2024