देशभरातील पूरामुळे १५ हजार कोटींचे नुकसान

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जून अखेरीस सुरू झालेल्या पावसाने यंदा भारतातील अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजवला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्ये गेल्या काही आठवड्यांपासून पुराच्या तडाख्यात आहेत. पुरामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे.काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड या राज्यांतील पर्यंटन व्यवसायाचे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पंजाब, हरियाणातील पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार पुरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला 10 ते 15 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या इकोरॅप (Ecowrap) अहवालात आकडेवारी देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, पुरामुळे देशाचे 10,000 कोटी ते 15,000 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नैसर्गिक कारणांमुळे होणारी जीवित व वित्तहानी ही चिंतेची बाब असल्याचे अहवालात म्हटले आहे. पुरापूर्वी बिपरजॉय वादळानेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते.
एसबीआयच्या अहवालानुसार, अमेरिका आणि चीननंतर भारताला नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका बसत आहे. 1990 नंतर भारताला अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला. 1900 ते 2000 या 100 वर्षांमध्ये भारतात नैसर्गिक आपत्तींची संख्या 402 होती. तर 2001 ते 2022 या 21 वर्षांत त्यांची संख्या 361 होती.
एसबीआयने नैसर्गिक आपत्तींमध्ये पूर व्यतिरिक्त दुष्काळ, भूस्खलन, वादळ आणि भूकंप यांचा समावेश केला आहे. अहवालानुसार, सर्वात जास्त विध्वंस पुरामुळे होतो. एकूण नैसर्गिक आपत्तींपैकी 41 टक्के एकट्या पुराचा वाटा आहे. पुरानंतर वादळाने मोठे नुकसाने केले आहे.
भारतातील नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानामागे विम्याचा अभाव हे एक प्रमुख कारण असल्याचे एसबीआयचे मत आहे.उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश आणि राष्ट्रीय राजधानी दिल्ली या डोंगराळ राज्यांना यंदाच्या पावसात अधिक नुकसान सहन करावे लागत आहे
SL/KA/SL
20 July 2023