ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ठाकरे गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपाधीवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली.
सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या तक्रारी भांडूप पोलीस ठाण्यात दत्ता दळवी यांच्यावर भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान अटकेनंतर दत्ता दळवींना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करत आहेत.
SW/KA/SL
29 Nov. 2023