नरहर कुरुंदकर स्मारकासाठी १४.७८ कोटी मंजूर
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थोर विचारवंत आणि साहित्यिक कै. नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड येथील स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी राज्य सरकारने १४.७८ कोटी रूपये मंजूर केले आहेत. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला.
कै. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक पूर्णत्वास यावे, यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालवला होता , आज त्यास अखेर यश आले आहे. सन २०१० मध्ये अशोकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना या कै. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक उभारण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. सुमारे २ कोटी रूपयांचे कामही पूर्ण करण्यात आले होते. मात्र, त्यांच्यासारख्या थोर साहित्यिक आणि विचारवंतांचे स्मारक यथोचित व्हावे, यासाठी अधिक काम करण्याची मागणी समोर आली होती.
त्यानुसार अशोकराव चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना याच खात्यामार्फत दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार करून घेण्यात आला. नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तो राज्य शासनाकडे सादर करण्यात आला. त्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी अशोकराव चव्हाण सातत्याने प्रयत्नशील होते. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय भाषणातही त्यांनी या प्रस्तावाच्या मंजुरीचे आश्वासन मिळवून घेतले होते. त्यानुसार आज याबाबतचा शासननिर्णय निर्गमित झाला आहे. कै. नरहर कुरुंदकर यांचे स्मारक पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
ML/ML/SL
16 March 2024