पेरू देशात १३०० वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध

 पेरू देशात १३०० वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध

लिमा, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगभरातील प्राचीन संस्कृती लाभलेल्या महत्त्वाच्या देशांमध्ये दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशाचा समावेश होतो. आता पेरू देशातील पुरातत्त्व संशोधकांनी तेराशे वर्षांपूर्वीच्या राणीच्या दरबाराचा शोध लावला आहे. हे दालन विविध रंगीत भित्तिचित्रांनी सजवलेले आहे. त्यामध्ये या मोचे साम्राज्याच्या राणीचे चित्रण आहे.पॅनामार्का याठिकाणी केलेल्या उत्खननात दरबाराचे हे दालन सापडले आहे. ते इसवी सनाच्या सातव्या शतकातील आहे. त्या काळात या परिसरावर मोचे राजांचे साम्राज्य होते. इसवी सन ३५० ते ८५० या काळात उत्तर पेरूमध्ये मोचे साम्राज्य भरभराटीस आले होते. याकाळात अनेक सुंदर इमारती व मकबरे बांधण्यात आले. मानवी चेहरे असलेल्या सिरॅमिकच्या वस्तू आणि अन्य अनेक कलाकृतीही या काळात बनवण्यात आल्या होत्या.

त्या काळात पेरूमध्ये लेखनकला अवगत नव्हती. पॅनामार्का किंवा पेरूमध्ये इतरत्रही खास एखाद्या राणीचे सिंहासन असलेले दालन सापडलेले नव्हते. तिचे सिंहासन हिरव्या रत्नांनी व तिच्याच केसांनी सजवले होते. या केसांची डीएनए चाचणीही केली जाणार आहे. या दालनाच्या खांब व भिंतींवर अनेक भित्तिचित्रे आहेत. अगदी सिंहासनावरही चित्रे रंगवलेली आहेत. त्यात विविध प्रकारे या राणीचे चित्रण केलेले दिसून येते. एका चित्रात ती मुकुट परिधान करून सिंहासनावर बसलेली दिसते. एका चित्रात ती सिंहासनावर बसून पक्ष्यासारख्या दिसणार्‍या माणसाबरोबर संवाद साधताना दिसत आहे. या राणीचे थडगे किंवा तिच्या देहाचे अवशेष अद्याप शोधण्यात आलेले नाहीत.

SL/ ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *