दिल्लीच्या सीमेवरून सोनम वांगचुक यांच्यासह 120 आंदोलकांना अटक
नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लडाखपासून सुमारे 700 किमी पायी चालून दिल्लीत पोहोचलेले हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुकसह 120 जणांना काल रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी वांगचुक यांना दिल्लीच्या बवाना पोलिस ठाण्यात नेले, तेथे त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वांगचुक यांना दिल्ली सीमेवर रात्र घालवायची होती. दिल्लीत 5 ऑक्टोबरपर्यंत कलम 163 लागू आहे. मोर्चेकऱ्यांना परत जाण्यास सांगण्यात आले, त्यांनी न ऐकल्यावर कारवाई करण्यात आली.
ताब्यात घेतल्यानंतर वांगचुक यांनी X वर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले आहे की, म- मला दिल्लीच्या सीमेवर ताब्यात घेण्यात आले आहे. काही लोक म्हणत आहेत की येथे एक हजार पोलीस आहेत. आमच्यासोबत अनेक वडीलधारी मंडळी आहेत. आपल्या नशिबात काय लिहिले आहे ते कळत नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि लोकशाहीची जननी असलेल्या बापूंच्या समाधीकडे आम्ही शांततेत निघालो होतो. हे राम.
वांगचुक यांना वकिलांना भेटू दिले नाही वांगचुक यांच्याशी संबंधित लोकांनी सांगितले की, वांगचुक यांना बवाना पोलिस ठाण्यात वकिलांना भेटू दिले जात नव्हते. त्यामुळे वांगचुक यांच्यासह अन्य समर्थकांनीही उपोषण सुरू केले आहे. या मोर्चासाठी वांगचुक यांनी मोदी आणि अमित शहा यांना ईमेलही पाठवून परवानगी मागितली होती.
त्यानंतर आज सकाळी लडाखचे खासदार हाजी हनीफा हेही वांगचुक यांच्या निषेधात सहभागी होण्यासाठी सिंघू सीमेवर पोहोचले. दिल्ली पोलिसांनीही त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेऊन नरेला पोलीस ठाण्यात पाठवले.
वांगचूक यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर दिल्लीतील वातावरण तापले आहे. आप आणि काँग्रेस पक्षाने यावर जोरदार टिका केली आहे. याबाबत बोलताना दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या,
“पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे उद्या २ ऑक्टोबर रोजी दिल्लीत जाणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना पोलिसांनी अटक केली. एवढंच नाही तर पोलिसांनी मला देखील सोनम वांगचुक यांना भेटू दिले नाही. ही भारतीय जनता पक्षाची हुकूमशाही आहे. सोनम वांगचुक यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. लडाखमध्ये एलजी राजवट संपली पाहिजे आणि दिल्लीतील एलजी राजवटही संपली पाहिजे. मात्र, लोकांचा अधिकार काढून सर्व अधिकार दिल्लीच्या एलजींना दिले आहेत. आताही मला पूर्ण विश्वास आहे की, या पोलीस अधिकाऱ्यांना एलजी साहेबांचा फोन आला असेल आणि निवडून आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही सोनम वांगचुक यांना भेटू देऊ नका. मात्र, सोनम वांगचुक यांच्या अटकेची आणि आम्हाला त्यांना भेटू न दिल्याचा निषेध करत आहोत.
लेह ॲपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स गेल्या 4 वर्षांपासून लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. या संदर्भात एक महिन्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी सुमारे 120 लोकांसह लेह ते दिल्लीतील बापूंच्या समाधी स्थळापर्यंत पायी मोर्चा काढला. त्यांनी या मोर्चाला दिल्ली चलो असे नाव दिले. सोमवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले.
SL/ML/SL
1 Oct 2024