राज्यात पाच वर्षांत ११५ वाघांचा मृत्यू

नागपूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांचे विविध कारणांनी मृत्यू होत असताना आता राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांबाबत एक धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकार कायद्यांतर्गत समोर आली आहे. महाराष्ट्रात 2018 ते 2022 या पाच वर्षात तब्बल 115 वाघांचा विविध कारणाने मृत्यू झाला आहे. यात 24 वाघांचा मृत्यू शिकारीमुळे झाला आहे. त्यामुळे शिकार रोखण्यासाठी वन विभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसत आहे. शेतात लावण्यात येणाऱ्या विजेच्या प्रवाहाने दहा वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय अंतर्गत हे उघडकीस आले आहे.
वाघांच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहे. वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाघांच्या संख्येत वाढ देखील झाली आहे. मात्र एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना वाघांचे मृत्यू देखील होत आहेत. 2018 ते 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत राज्यात 115 वाघांचा विविध कारणामुळे मृत्यू झाला आहे. तर, 24 वाघांची शिकार करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीत वन विभागाने हे आकडे दिले आहेत. 2018 ते 2022 वाघांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणाने झाला. नैसर्गिक मृत्यू – 67, शिकार – 24, अपघात – 14, विद्युत प्रवाहामुळे – 10 मृत्यू झाले.
जंगलातून जाणारे महामार्गही वाघांसाठी आता धोकादायक ठरत आहेत. 14 वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. शेतात लावण्यात येणारे विद्युत प्रवाह वाघाच्या जिवावर उठले. दहा वाघांचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे झाला आहे. वाघांचे सर्वाधिक 32 मृत्यू हे 2021 मध्ये झाले आहेत. व्याघ्र संवर्धनासाठी वनविभागाकडून अनेक प्रयत्न करण्यात येतात. मात्र हे प्रयत्न अपुरे ठरत असल्याचं यातून दिसून येतय. असं माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर यांनी सांगितलं.
SL/KA/SL
28 July 2023