११ वर्षांची सौम्या ठरली देशातील सर्वात कमी वयाची सतारवादक

अकोला दि २९(एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोल्यातील माउंट कारमेल शाळेत शिकणारी सौम्या गुप्ता ही केवळ 11 वर्षाची मुलगी आज देशातील सर्वात कमी वयाची सतारवादक म्हणून नावारूपास आलेली आहे.वयाच्या आठव्या वर्षापासून सतारवादनाशी जुळलेले तिचे नाते देशभरात विविध सन्मान प्राप्त करून देणारे ठरले आहे.
सतार हे सर्वात कठीण वाद्य आहे त्यात 20 ते 22 तार असतात प्रत्येक तारेचे महत्त्व त्यातील सूर वेगळा असतो.सौम्याने वयाच्या आठव्या वर्षापासून तिचे वडील डॉ.अभिनंदन गुप्ता यांच्याकडून सतार शिकण्यास सुरुवात केली आणि कौशल्याच्या माध्यमातून आज तिचा देशातील सर्वात कमी वयाची सतार वादक म्हणून गौरव होत आहे.आज तिचे अनेक ठिकाणी सतार वादनाचे कार्यक्रम होत असुन पंडित हरिप्रसाद चौरसिया, अनुप जलोटा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल आणि विविध मान्यवरांनी सौम्या गुप्ता यांच्या सतार वादनाचे कौतुक करून आशीर्वाद दिले आहेत.
सौम्या गुप्ता ही साडे नऊ वर्षांची असताना तिची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड् लंडनमध्ये सर्वात तरुण सतार वादक म्हणुन करण्यात आली असून तिला इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्ससह सर्वात तरुण सतार वादक, उत्कृष्ठ साधिका म्हणून राष्ट्रीय पातळीवरील अनेक सन्मान मिळालेले आहेत. सौम्याचे वडील डॉ.अभिनंदन गुप्ता हे श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक असून उत्तम सतार वादक आहेत त्यामुळे सौम्याने आपल्या वडिलाकडून सतार वादनाचे धडे घेतले, गुप्ता कुटुंबाला संगीताची परंपरा लाभलेली असून सौम्याला सतार वादनासाठी तिच्या वडिलांनी प्रेरणा दिली.
सौम्या ही कुटुंबातील एकमेव मुलगी असून शिक्षणासोबतच कला सुद्धा महत्त्वाची असते त्यामुळेच सौम्याला वडिलांनी लहानपणापासून सतार वादन शिकवले.आज तिला विविध स्तरावरील राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुद्धा तिची माहिती पाठवण्यात आली आहे. आज सतार वादनाच्या कलेमुळेच तिला देशभरात ओळख मिळाली असून यामुळे महाराष्ट्राचा आणि अकोला जिल्ह्याचा नावलौकिक झाल्याची भावना सौम्या गुप्ताचे वडिल डॉ.अभिनंदन गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.
ML/KA/SL
29 Aug 2023