इंडोनेशियात ज्वालामुखी उद्रेकामुळे ११ गिर्यारोहकांचा मृत्यू

सुमात्रा, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज इंडोनेशियामध्ये मारापी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, १२ जणांचा शोध सुरू आहे. त्याचवेळी ४९ जणांना जिवंत वाचवण्यात यश आले आहे. २८९१ किलोमीटर उंचीवर असलेल्या ज्वालामुखीने सुमारे 3 किलोमीटर उंचीवर राख फेकली.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील रस्ते आणि वाहने राखेने भरली होती.
सोमवारी येथे एक छोटासा स्फोटही झाल्याची माहिती आहे. त्यामुळे काही काळ बचावकार्य थांबवण्यात आले आहे. मारापी म्हणजे अग्नीचा पर्वत. हा सुमात्रा बेटावरील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या ठिकाणाजवळ दोन पर्वत चढाईचे मार्ग आहेत, जे आता बंद करण्यात आले आहेत. तसेच, ज्वालामुखीच्या मुखापासून 3 किलोमीटरपर्यंत उतारावर असलेली गावे खबरदारीचा उपाय म्हणून रिकामी करण्यात आली आहेत. स्फोटानंतर ज्वालामुखीतून लाव्हा बाहेर येण्याची शक्यता आहे. इंडोनेशियन द्वीपसमूह पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित आहे, जेथे महाद्वीपीय प्लेट्सच्या भेटीमुळे उच्च ज्वालामुखी आणि भूकंपीय क्रिया होतात.
SL/KA/SL
4 Dec. 2023