*पन्नास वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

मुंबई, दि २१: पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यात रांजणी येथील रयत शिक्षण संस्थेच्या नरसिंह विद्यालयात ५० वर्षांनी १९७५/७६ या दहावीच्या प्रथम बॅच विद्यार्थ्यांचे ऐतिहासिक सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक निलेश बाणखेले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
स्नेहबंध परिवाराच्या वतीने नुकताच तब्बल ५० वर्षांनी पुन्हा दहावीचा वर्ग भरला. तीच शाळा, तोच वर्ग, तेच विद्यार्थी विद्यार्थिनी आणि विशेष म्हणजे तेच वर्गशिक्षक आपल्या पत्नी समवेत वर्गात एकत्र बसले होते.
रांजणी येथील नरसिंह विद्यालयात १९७५/७६ या वर्षातील १० वी मधील पहिल्या बॅचचे विद्यार्थी सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. सर्वांचा नाष्टा चहापाणी झाले. सगळ्यांनाच फेटे बांधल्यामुळे एक रंगतदार सोहळा दिसत होता. त्यावेळी त्यांनी एकमेकांची ओळख काढत आपल्या आठवणींना उजाळा दिला. या वर्गाची सुरुवात नेहमीप्रमाणे सकाळी शाळेची घंटा वाजवून प्रार्थना करून झाली. सर्व विद्यार्थी आपापल्या जागी स्थानापन्न झाले. सरस्वती व गणेश पूजन झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी माजी वर्गशिक्षक बी. डी. झावरे, बी. जी. जाधव. डी. एल. कसबे, मुख्याध्यापक निलेश बाणखेले, प्राचार्य धुंडे सर, स्कूल कमिटीचे सदस्य मधुकर हांडे, जाधववाडी गावचे माजी सरपंच रामदास जाधव यांचा शाल, पुष्पगुच्छ, पेन आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिल्यानंतर त्यांचा शिक्षकांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पेन देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नरसिंह विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक निलेश बाणखेले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, यापूर्वी मी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला हजर होतो, परंतु माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहण्याची माझी पहिलीच वेळ आहे. तुम्हाला शुभेच्छा देण्यासारखा इतका मी मोठा नाही. परंतु ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, आपले उर्वरित आयुष्य सुख समाधानाचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो. ईश्वराने तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा राहिल्या इच्छा असतील, त्या पूर्ण करण्याची शक्ती देवो. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, संस्थेच्या आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण शाळेच्या इमारती उभारत आहोत. त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा आपल्याच विद्यार्थ्यांना पूर्ण करून द्याव्यात. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे चांगल्या पद्धतीचे योगदान असणे आवश्यक आहे. माजी शिक्षक बी. डी. झावरे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की, उत्कृष्ट आयोजन व नियोजनाबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. प्रत्येकाच्या घरामध्ये आयटी इंजिनिअर आहेत, हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांना मारले असेल, परंतु त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, हीच आमची इच्छा होती. म्हणूनच आज प्रत्येक विद्यार्थी आपल्या स्वतःच्या पायावर उभा आहे. आपले मित्र अडचणीत असतील तर त्यांना मदत केली पाहिजे. याप्रसंगी माजी शिक्षक बी.जी. जाधव, डी. एल. कसबे, धुंडे सर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली, कार्यक्रमाचे प्रास्तविक श्रीपत मुळे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक भगवान भोर यांनी खुमासदार शैलीत केले, तर आभार देवराम भोर यांनी मानले. या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थी आणि वाहतूक व्यवसायातील मराठी उद्योजक मनोहर शेळके, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे माजी सचिव आणि पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी, त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. पन्नास वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचे मोठे आव्हान होते. हे आव्हान स्वीकारून, या विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यासाठी सर्वश्री. देवराम भोर, निवृत्ती भोर, सुदाम भोर, गोविंद बोराडे, विलास भोर, बबन मुळे, श्रीपत मुळे, रामदास जाधव, जयसिंग आजाब, भिमाजी मिंडे इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. त्यामुळेच आठवणीत राहणारे ऐतिहासिक असे सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन यशस्वीपणे संपन्न झाले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रुप फोटो काढून, रुचकर जेवणानंतर कार्यक्रमाचा शेवट झाला. KK/ML/MS