रायगडमध्ये नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी १ हजार कोटींच्या निविदा
अलिबाग, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महापूर, दरडी कोसळणे, अतिवृष्टी, वणवे अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या काही वर्षांपासून कोकणातील रायगड जिल्ह्याला ग्रासले आहे. त्यामुळे पावसाळा जवळ आला ही येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. आपत्कालिन स्थितीत शासनाकडून तातडीने मदत कार्य केले जाते. असे असले तरीही दर वर्षीच पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कोट्यवधींची वित्तहानी होते, त्याचबरोबर जीवितहानीलाही सामोरे जावे लागते.दरवर्षी वाढत जाणारा नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी ‘कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना’ राबवण्यात येत असून रायगडमधील नैसर्गिक आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पाठवलेल्या एक हजार १० लाख रुपयांच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.आपत्ती निवारणातील काही कामे प्रदीर्घ कालावधीत करावी लागणार आहेत. तर काही कामे यंदाच्या पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राज्य सरकारने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत प्रस्तावास निधी मंजूर केला आहे.
चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण गावांमध्ये निवारा केंद्र बांधणे, चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण प्रमुख तालुका मुख्यालय व आपत्तीप्रवण गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे, महाड शहरनजिक सावित्री नदीलगत संरक्षक भिंत बांधणे यासाठी निधी खर्च केला जाणार आहे.
नैसर्गिक आपत्तीपासून बचाव करण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज असून त्या उभारण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक हजार ८०० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. यातील एक हजार १० लाख कोटींच्या कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली. २००५ पासून नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु इतक्या व्यापक प्रमाणात पहिल्यांदाच उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. नवीन व जुन्या खार बांधांचे नूतनीकरण करणे, समुद्र धूप प्रतिबंधात्मक बंधारे बांधणे,
आपत्तीनिवारणार्थ होणाऱ्या कामांच्या खर्चाचा सर्वसाधारण तपशील
- महाडमध्ये निवारा केंद्रासाठी भूसंपादन ६.३३
- चक्रीवादळ निवारा केंद्र ४१.५०
- जिल्ह्यातील भूमिगत विद्युत वाहिनी ६९९.६८
- १४ गावांमध्ये निवारा शेड ५.६०
- महाडमध्ये २० निवारा शेड ३६.५६
- महाड जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती १.१७
- अलिबागअंतर्गत १७ शाळांची दुरुस्ती ३.७१
- महाडमध्ये नवीन २८ निवारा केंद्र ६५.४९
एकूण १०१०.९० कोटी
SL/ML/SL
27 April 2024