जे. जे. रुग्णालयात १०० रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण

मुंबई, दि. १५ : जे. जे. रुग्णालयात एप्रिल महिन्यात सुरू झालेली रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. अवघ्या ८३ दिवसांत रुग्णालयाने १०१ रुग्णांवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रिया गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले की, रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया ९ एप्रिल रोजी करण्यात आली. खाजगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा खर्च साधारण ३ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत येतो; परंतु जे. जे. रुग्णालयात या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत.
अलीकडच्या काळात भारताने रोबोटिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही आधुनिक तंत्रज्ञान पद्धत अधिक अचूक, कमी वेदनादायक आणि जलद बरे होणारी शस्त्रक्रिया शक्य करते. वैद्यकीय शिक्षण विभागाने जे. जे. रुग्णालयात ही प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे ३२ कोटी रुपयांच्या खर्चाने ती उभारण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या शस्त्रक्रिया
पित्ताशय काढणे, हर्निया शस्त्रक्रिया, गुंतागुंतीच्या ठिकाणी असलेले ट्यूमर काढणे
लवकरच सुरू होणाऱ्या सेवा
गॅस्ट्रोएंटरोलॉजी, यूरोलॉजी (उदा. प्रोस्टेट, मूत्राशय, मूत्रपिंड शस्त्रक्रिया) स्त्रीरोगशास्त्र
SL/ML/SL