राजकोट किल्ल्याजवळ १०० कोटींची शिवसृष्टी उभारणार

राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक पर्यटनासाठी आरक्षित जागेत ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवसृष्टी’ प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी १०० कोटींचा निधी अपेक्षित असून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पात काय असणार, याचे सादरीकरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्¬या पुतळ्याची जागा राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. आता तेथे सार्वजनिक बांधकाम विभाग पुतळा उभारत आहे. यासाठी २० कोटी खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे; मात्र त्याचबरोबर येथे भव्य असा पर्यटन प्रकल्प व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. त्यामुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित तसेच शिवकालीन वास्तव दर्शवित असलेला प्रकल्प व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे केसरकर यांनी सांगितले.