मनेका गांधींना या कारणामुळे १०० कोटींची मानहानी नोटीस
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्कॉन (ISKCON) या धार्मिक संस्थेच्या कारभाराबाबत वादग्रस्त आरोप करणे भाजप खासदार मनेका गांधी यांना आता चांगलेच भोवले आहे. यावरुन इस्कॉनने गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. संस्थेकडून मनेका गांधी यांना १०० कोटींची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.इस्कॉनकडून याप्रकरणी कायदेशीर खटला चालवला जाईल आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल, असं इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमन दास म्हणाले आहेत.
मनेकां गांधींचे वादग्रस्त वक्तव्य
इस्कॉनमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. इस्कॉन आपल्या गोशाळेतील गायी कत्तलखान्यात विक्री करत आहेत. ते सगळ्यांसमोर ‘हरे कृष्णा, हरे रामा’चा जप करतात. पण, दुसरीकडे ते गायींची विक्री कत्तलखान्यात करतात असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. इस्कॉन देशातील सर्वात मोठी फसवणूक करणारी संस्था आहे. ते गोशाळा उभारतात. त्यासाठी सरकारकडून फायदे उठवतात. मोठ्या प्रमाणात जमीनी घेतात. त्यांच्या गोशाळेला मी भेट दिली होती. त्यांच्या गोशाळेत एकही दूध न देणारी गाय नव्हती. याचा अर्थ ते आपल्या गायी कत्तलखान्याला विकत आहेत, असे वक्तव्य करणारा मनेका गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
मनेका गांधी यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि जगभरातील इस्कॉन भाविकांच्या भावना दुखावणारं आहे. माजी मंत्री राहिलेल्या खासदार मनेका गांधी पुराव्याशीवाय असे आरोप कसे करु शकतात? त्या म्हणतात की त्यांनी अनंतपूर गोशाळेला भेट दिली. पण, मनेका गांधी आल्याचं तेथील लोकांना कशामुळे आठवत नसेल. त्या तेथे गेल्याच नाहीत. त्यामुळे घरी बसून त्यांनी हे बेछूट आरोप केलेत, असं राधारमन दास म्हणालेत.
SL/KA/SL
29 Sept. 2023