नमो महारोजगार मेळाव्यातून 10 हजार नोकऱ्या, जाणून घ्या तपशिल

नागपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक पदे भरली जाणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी https://www.mahaswayam.gov.in/index_inner या अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी एकूण रिक्त जागा, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
नमो महारोजगार मेळाव्याअंतर्गत दहा हजारहून अधिक जागा भरल्या जातील. यात फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे भरली जाणार आहे.
यासाठी दहावी, बारावी, आयटीआय, डी फार्म, एमबीए, पदवीधर, डिप्लोमाधारक, पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. 9 आणि 10 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत मेळावा होणार आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, नागपूर विद्यापीठ, अमरावती रोड, नागपूर येथे हा मेळावा होणार आहे.