असा होणार रतन टाटांच्या 10 हजार कोटींची संपत्तीचा विनियोग
मुंबई, दि. २५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी 10 हजार कोटी रुपयांची संपत्ती मागे ठेवली. आपल्या इच्छेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांनी चार जणांवर दिली आहे. मृत्यूपत्रात त्यांनी आपला जर्मन शेफर्ड कुत्रा टिटोची काळजी घेण्यासाठी तरतूद केली. एखाद्या उद्योगपतीने आपल्या मृत्यूपत्रात अशी तरतूद करण्याची भारतातील ही कदाचित पहिलीच वेळ आहे. रतन टाटा यांनी त्यांचे फाउंडेशन, भाऊ जिमी टाटा, सावत्र बहिणी शिरीन आणि डायना जीजीभॉय, घरातील कर्मचारी आणि इतरांनाही त्यांच्या मालमत्तेत भागधारक बनवले आहे. टाटांच्या मालमत्तेमध्ये अलिबागमधील 2,000 चौरस फुटांचा बंगला, मुंबईतील जुहू येथे दोन मजली घर, 350 कोटी रुपयांची एफडी आणि टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्समधील 0.83 टक्के हिस्सा यांचा समावेश आहे. टिटोला रतन टाटा यांनी पाच-सहा वर्षांपूर्वी दत्तक घेतले होते. त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी त्यांचा स्वयंपाकी राजन शॉ यांच्यावर दिली आहे. मृत्युपत्रात तीन दशके रतन टाटा यांच्याशी संबंधित असलेले बटलर सुब्बिया यांच्यासाठीच्या तरतुदींचाही समावेश आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान शॉ आणि सुब्बियासाठी डिझायनर कपडे खरेदी केल्याचे मानले जाते.
मृत्युपत्रात रतन टाटा यांचे कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांचेही नाव आहे. टाटांनी नायडूंच्या गुडफेलो या उपक्रमातील आपला हिस्सा सोडला आहे. नायडूंनी परदेशात शिक्षणासाठी घेतलेले वैयक्तिक कर्जही त्यांनी माफ केले आहे. टाटा समूहाची धर्मादाय ट्रस्टला शेअर्स सोडण्याची परंपरा आहे. रतन टाटा यांनीही याचा खुलासा केला आहे. त्यांचा हिस्सा रतन टाटा एंडॉवमेंट फाउंडेशन (RTEF) कडे हस्तांतरित केला जाईल. सूत्रांचे म्हणणे आहे की टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन आरटीईएफचे अध्यक्ष होऊ शकतात.
SL/ ML/ SL
25 Oct 2024