वर्धा जिल्ह्यात १ हजार ६३५ मतदार करणार गृह मतदान
वर्धा, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदाच दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांना गृह मतदानाची सोय उपलब्ध करुन देण्यात असून ज्या दिव्यांग आणि ८५ वर्षावरील मतदारांनी १२ डी नमुना भरुन दिला आहे. त्यांच्यासाठी आज १२ एप्रिल पासून गृह भेटीद्वारे मतदान सुरू झाले असून यात वर्धा लोकसभा मतदार संघातून एकूण १ हजार ६३५ मतदार गृह मतदान करणार आहे.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ यांच्या उपस्थितीत शहरी , ग्रामीण भागातील दिव्यांग तसेच ८५ वर्षावरील नागरिकांच्या घरी जाऊन मतदान करून घेतले. मतदान केल्या नंतर विश्वास शिरसाठ यांनी मतदाराचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. यावेळी तहसीलदार हरीश काळे यांच्यासह निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यातील वर्धा लोकसभा क्षेत्रात ८५ वर्षावरील २५ हजार २२ मतदार आहेत. त्यामध्ये १२ डी नमुना सादर केलेले एकूण मतदार १ हजार ३३५ मतदार आहे. तसेच ११ हजार ८२४ दिव्यांग मतदार असून ३०० दिव्यांग मतदारांनी १२ डी नमुना सादर केला आहे. दिव्यांग आणि ८५ वर्षावरील एकूण १ हजार ६३५ मतदार गृह मतदान करत आहे.
वर्धा लोकसभा मतदार संघात गृह मतदान प्रक्रियेसाठी एकूण ७८ पथके कार्यरत असून ११ पथके राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये धामणगाव रेल्वे येथे २० पथके, मोर्शी येथे १५ पथके, आर्वी येथे १५ पथके, देवळी येथे १० पथके, हिंगणघाट येथे १० पथके, वर्धा येथे ८ पथके कार्यरत आहेत.
मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा या पाच विधानसभा मतदार संघात आज १२ एप्रिल पासून या मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली असून धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात १७ एप्रिल पासून गृह मतदानाला सरूवात होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत गृह भेटीव्दारे मतदानाची प्रक्रिया चालणार आहे.
ML/ML/SL
12 April 2024