बनावट नोटा देऊन 1.60 कोटीची सोने खरेदी
गुजरातमध्ये बनावट नोटांचा वापर करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सराफा व्यापारी मेहुल ठक्कर याच्याकडून या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 1 कोटी 30 लाख रुपयांची ही रोख रक्कम एका व्यक्तीने 2100 ग्रॅम सोन्याची बिस्किटे विकत घेण्याच्या बदल्यात दिल्याचे व्यावसायिकाने सांगितले.
मशीनमधून पैसे मोजले जाऊ लागले तेव्हा या नोटा बनावट असल्याचे उघड झाले. नोटांवर महात्मा गांधींऐवजी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो छापण्यात आला आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी रिसोल बँक ऑफ इंडिया असे लिहिले आहे. पोलिसांनी तीन अनोळखी तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामागील सूत्रधार कोण आणि या नोटा कुठे छापल्या गेल्या याचा तपास पोलीस करत आहेत.