शून्य अपघातात संपन्न संस्कृतीची दहीहंडी २०२५!

 शून्य अपघातात संपन्न संस्कृतीची दहीहंडी २०२५!

*मीरा-भाईंदर दि १७:– प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि वंदना विकास पाटील जनहित संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृतीची दहीहंडी २०२५ हा भव्य सोहळा यंदा मीरा-भाईंदरमध्ये उत्साहात पार पडला. दरवर्षी ठाण्यात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा हा पारंपरिक उपक्रम, *परिवहन मंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक* यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच मीरा-भाईंदरमध्ये पार पडला.

कार्यक्रमात संपूर्ण दिवसभर १०० हून अधिक गोविंदा पथकांनी ५, ६, ७ आणि ८ थरांच्या सलामी लावून वातावरण दणाणून सोडले. ८ थर रचणाऱ्यांना २५००० रुपये, ७ थर रचणाऱ्यांना १५००० रुपये, ६ थर रचणाऱ्यांना १०००० रुपये आणि ५ थर रचणाऱ्यांना ५००० रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. विशेष बाब म्हणजे महिला गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त सहभाग यावर्षी दिसून आला. आयोजकांकडून महिला पथकांना लाईफ जॅकेट, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिके देण्यात आली.

यंदाच्या मानाच्या दहीहंडीचा मान जय महाराष्ट्र गोविंदा पथकाने ८ थर रचून पटकावला. या पथकाला ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तसेच ८ थरांची सलामी उत्तम प्रकारे सादर केल्याबद्दल जय मल्हार गोविंदा पथकाचाही आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,
“यंदाचा दहीहंडी सण माझ्यासाठी खूप खास आहे. कारण संस्कृतीच्या दहीहंडी उत्सवात सलग दोन वेळा १० थर रचून कोकणनगर गोविंदा पथक, जोगेश्वरी आणि जय जवान गोविंदा पथक, जोगेश्वरी यांनी अभूतपूर्व विश्वविक्रम केला आहे. पुर्वेश सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे आपला मातीतला खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. ठाण्याप्रमाणेच यंदा मीरा-भाईंदरमध्येही संस्कृतीची दहीहंडी मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.
पावसातही गोविंदांनी दिलेला प्रतिसाद लक्षणीय होता. सर्व आयोजन शिस्तबद्धपणे पार पडल्याने कोणालाही इजा झाली नाही. यापुढे दरवर्षी याहून अधिक उत्साह मिळेल अशी अपेक्षा आहे.”

संस्कृतीची दहीहंडी २०२५ हा उपक्रम मीरा-भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून यंदाच्या उत्सवाने दहीहंडी परंपरेला नवा आयाम दिला आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *