युनायटेड क्रिकेट क्लबला विजेतेपद
ठाणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : : ठाण्याच्या युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने ठाण्याच्याच बोरिवली क्रिकेट क्लबचा १८ धावांनी पराभव करत कुर्ला स्पोर्ट्स क्लब आयोजित ६५ व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत १५९ धावांचा पाठलाग करणाऱ्या बोरिवली क्रिकेट क्लबला २० षटकात १४१ धावांवर रोखत युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनने पहिल्यांदाच अजिंक्यपद मिळवले. तर १९७६-७७ नंतर यंदा ४६ वर्षांनी बोरिवली क्रिकेट क्लबला उपविजेतेपद मिळाले.
नाणेफेक जिंकून बोरिवली क्रिकेट क्लबने युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशनला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. या संधीचा फायदा उचलत यष्टीरक्षक आणि सलामीचा फलंदाज निशांत कांबळेने ५८ चेंडूत सात चौकर आणि तीन षटकार ठोकत ७८ धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.
प्रकाश आसवानीने ३८ आणि तश्यम चव्हाणने १९ धावा केल्या. राकेश नाईकने २५ धावांत ३ आणि आशिष यादवने एक फलंदाज बाद केला. विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात बोरिवली क्रिकेट क्लबला २० षटकात ८ गडी गमावून १४१ धावांपर्यंत मजल मारता आली. हर्ष मोरेने नाबाद २८, मोहम्मद रमीझने २६ आणि सम्राट मिसाळने २० धावा केल्या. शुभम रेवाळेने तीन आणि अमित राठोडने दोन बळी मिळवताना नियंत्रित गोलंदाजी केली.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात स्पोर्टीन क्रिकेट क्लबचे कार्यकारिणी सदस्य सुशील म्हापुस्कर यांनी डॉ राजेश मढवी यांच्यावतीने १६ व्या जी.एम.वैद्य पुरस्काराचा स्वीकार केला.
संक्षिप्त धावफलक : युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन :
२० षटकात ८ बाद १५९
(निशांत कांबळे ७८, प्रकाश आसवानी ३८, तश्यम चव्हाण १९, राकेश नाईक ४-२५-३, आशिष यादव ३-२५-१ ) विजयी विरुद्ध बोरिवली क्रिकेट क्लब : २० षटकात ८ बाद १४१ (हर्ष मोरे नाबाद २८, मोहम्मद रमीझ २६, सम्राट मिसाळ २०, शुभम रेवाळे ४-३७-३, अमित राठोड ३-१४-२, प्रसाद रहाटे३-२१-१ )
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू :
फलंदाज : निशांत कांबळे (युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन), गोलंदाज : राकेश नाईक (बोरिवली क्रिकेट क्लब). क्षेत्ररक्षक : भाविन भगत ( युनायटेड क्रिकेट कल असोसिएशन) , सामनावीर : निशांत कांबळे (युनायटेड क्रिकेट क्लब असोसिएशन), उत्तेजनार्थ : यश नाईक (बोरिवली क्रिकेट क्लब).
प्रवीण तांबे नेतृत्व करणार
गुजरातमधील आणंद येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय व्हेटरन आंतर राज्य टी २० क्रिकेट स्पर्धेत नवी मुंबईचा प्रवीण तांबे मुंबईच्या संघाचे नेतृत्व करेल. गुजरात राज्य व्हेटरन क्रिकेट संघटनेच्या सहकार्याने आणंद व्हेटरन क्रिकेट संघटना आयोजित ही स्पर्धा ८ ते १० जानेवारी दरम्यान व्ही.व्ही. नगर येथील इलेक्शन मैदानावर खेळवली जाईल.या स्पर्धेत मुंबईसह महाराष्ट्र्र, गोवा आणि यजमान गुजरातचा संघ असेल. स्पर्धेत मुंबईचा पहिला सामना ८ जानेवारीला यजमान गुजरात संघाशी होईल. दुसऱ्या लढतीत मुंबईसमोर गोव्याचे आणि शेवटच्या लढतीत गुजरातचे आव्हान असेल.
मुंबईचा संघ : प्रवीण तांबे (कर्णधार), रामचंद्र पोळ, रविराज धुरी, राजेश तांडेल, संदेश पतंगे, प्रदीप क्षिरसागर,संजय खामकर,
समीर पाटील, अजित रॉड्रिग्ज, तुषार जव्हेरी, समीर शाह, आशिष रेडीज, हिमांशू वायंगणकर.