भाग्यश्री फंड , नवी महिला महाराष्ट्र केसरी
कोल्हापूर , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची गदा अहमदनगरच्या भाग्यश्री फंड हिने पटकावली तर कोल्हापूरच्या अमृता पुजारी या महिला मल्लाचा भाग्यश्रीने पराभव करत महिला महाराष्ट्र केसरीच्या गदावर आपलं नाव कोरले. कोल्हापुरातील खासबाग मैदानात भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थायी समितीच्या परवानगीने आणि दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पहिली महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी संपूर्ण राज्यातून सफल 200 स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते.गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या त्या स्पर्धेचा काल अंतिम सामना झाला. अहमदनगरची भाग्यश्री फंड आणि कोल्हापूरची अमृता पुजारी यांच्यात अंतिम लढत झाली. यामध्ये भाग्यश्रीने अमृतावर विजय मिळवत चांदीच्या गदेवर आपलं नाव कोरलं. भारतीय कुस्ती महासंघाच्या अस्थायी समितीमार्फत कोल्हापुरात ही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खा श्रीकांत शिंदे ,पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा अंतिम सामना रंगला यामध्ये अहमदनगरचे भाग्यश्री फंड हिने महिला महाराष्ट्र केसरीचे गदा पटकावली तसेच बक्षीस म्हणून तिला चार चाकी देखील देण्यात आले. प्रत्येक वजनी गटामध्ये पहिला क्रमांक आलेल्या महिला कुस्तीगिरांना दुचाकी बक्षीस देण्यात आली.मात्र स्पर्धेनंतर अमृता पुजारी चे प्रशिक्षक तसेच त्यांच्या पालकांनी या स्पर्धेवर आक्षेप घेत स्पर्धेवर आणि आयोजकांवर टीका केली तसेच आपल्यावर अन्याय झाला असेही ते म्हणाले.
ML/KA/PGB 28 APR 2023