निलेश लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांनी कोणताही गाजावाजा न करता, कोणतेही शक्तfप्रदर्शन न करता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आज अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात साधेपणाने अर्ज भरला.
नीलेश लंके यांनी अर्ज भरत असताना कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. हनुमान जयंतीचे निमित्त साधत कार्यकर्त्यांनी त्यांना पितळी आणि चांदीची गदा भेट दिली. या गदा हातात घेतात, “मी हनुमानरायांचा भक्त आहे. गदा कोणालाही मिळत नसते. मी पैलवानच आहे. मै किसके भी साथ खेलुंगा”, असे आव्हान नीलेश लंके यांनी विरोधकांना दिले.
माजी आमदार नीलेश लंके यांनी हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता हा अर्ज अतिशय साधेपणाने भरणार असल्याची माहिती नीलेश लंके प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली. त्यानुसार नीलेश लंके पारनेर तालुक्यातील हंगा येथील त्यांच्या घरातून अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. घरातून निघण्यापूर्वी त्यांना त्यांच्या सौभाग्यवती राणी लंके यांनी औक्षण केले. या वेळी नीलेश लंके यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, ज्येष्ठ नेते प्रताप ढाकणे , माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर आदी उपस्थित होते.
नीलेश लंके म्हणाले, “नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. जनशक्ती आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर हा उमेदवारी अर्ज भरला आहे. कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी दिलेल्या या दोन्ही गदा हनुमान भक्त म्हणून स्वीकारतो. मी पैलवान आहे कोणाशीही लढू शकतो. ही लढाई धनशक्तीविरद्ध जनशक्ती अशी आहे”. खूप उष्णता आहे. उन्हामध्ये लोकांना बोलून, त्यांची रोजंदारी बुडवणे योग्य वाटले नाही.
हनुमान जयंती असल्यामुळे जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम आहे. लोकांना बोलवून त्यांना वेठीस धरणे मला योग्य वाटले नाही. समाजाला अडचण होईल असं मी काही करणार नाही. त्यामुळे शांततेत येऊन अर्ज भरला तरीदेखील कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली. शक्तिप्रदर्शन करायचे असते, तर मला लोक विकत आणण्याची गरज पडत नाही. भाडंदेखील देण्याची गरज पडत नाही. नुसते आवाहन केले असते, तरी हजारो लोक येथे जमा झाले असते. तरीदेखील हजारो लोक येथे उपस्थित आहेत असे नीलेश लंके यावेळी म्हणाले.
ML/ML/SL
26 April 2024