आंगणवाडी सेविकांनी लवचिक भूमिका घेतल्यास प्रश्न सोडवू

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सुमारे ८० हजार आंगणवाडी सेविका , आशा कर्मचारी दीड महिन्यांपासून संपावर आहेत, त्यांच्या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. कामकाज सुरू होताच त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
सरकार यावर गंभीर आणि सकारात्मक आहे, मात्र आताच सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात असा आग्रह चुकीचा आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. थोडी लवचिक भूमिका स्वीकारली तर मार्ग निघेल, मुख्यमंत्र्यानी अनेक वेळा वेळ देऊन चर्चा केली मात्र थोडे पुढे मागे करण्याची त्यांची तयारी असेल तर तोडगा निघेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सरकारच्या आर्थिक बोज्याचा ही विचार केला पाहिजे , आजकाल आताच हवे , आजच हवे अशी अपेक्षा लोक धरू लागले आहेत, असा टोला त्यांनी यावेळी कोणाचे ही नाव न घेता लगावला , कालच्या जरांगे यांच्या आक्रस्ताळी भूमिकेची पार्श्वभूमी याला होती. त्यामुळे थोडे पुढे मागे करा , चर्चेने प्रश्न सुटेल असे पवार म्हणाले.
सभागृहात यानंतर माजी मुख्यमंत्री , माजी केंद्रीय मंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी आणि विद्यमान सदस्य राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात शोकप्रस्ताव मांडला आणि सभागृहाने तो संमत केला , त्यानंतर उभे राहून आदरांजली वाहिली. आंगणवाडी सेविकांनी लवचिक भूमिका घेतल्यास प्रश्न सोडवू
ML/KA/PGB
26 Feb 2024