अमृता फडणवीस यांनी दाखल केला डिझायनरवर लाच दिल्याचा गुन्हा
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि त्यांना धमकावून त्यांच्याविरोधात कट रचल्याप्रकरणी मुंबईतील एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिष्का असे या डिझायनर असणाऱ्या महिलेचे नाव आहे. अनिष्का हिच्या वडिलांविरोधात एका गुन्ह्याची नोंद आहे. याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी अनिष्काने अमृता फडणवीस यांना १ कोटी रुपयांची लाच देऊ करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता ही सगळी माहिती समोर आली आहे.
अमृता फडणवीस यांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या आलेल्या तक्रारीनुसार, अनिष्काने १८ आणि १९ फेब्रुवारीला एका अज्ञात मोबाईल नंबरवरुन त्यांना एक व्हिडिओ क्लीप, मेसेज आणि व्हॉईस नोट पाठवली. त्यानंतर अनिष्का आणि तिच्या वडिलांकडून अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे धमकावण्यात आले. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर अनिष्का आणि तिच्या वडिलांविरोधात कलम १२० ब ( कट रचणे), भ्रष्टाचार कायदा १९८८ मधील कलम ८, कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. परंतु, अद्याप अनिष्का किंवा तिच्या वडिलांना अटक करण्यात आलेली नाही. बुकींच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठी आणि वडिलांना एका गुन्हेगारी प्रकरणातून सोडवण्यासाठी अनिष्काने अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
दरम्यान या बाबत विरोधीपक्ष नेते अजित दादा पवार यांनी आज विधानसभेत अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या या गुन्ह्याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच अनिष्का या गुन्हा दाखल झालेल्या मुलीच्या वडीलांचे नाव अनिल जयसिंघानी असल्याचे स्पष्ट केले. तसेच हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल अजितदादांना धन्यवाद दिले.
16 March 2023