बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देवनार पशुवधगृह आणि महालक्ष्मी येथे लहान प्राणी व पक्ष्यांवर अंत्यसंस्कारासाठी दहनवाहिनी कार्यान्वित
मुंबई, दि १६
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाकडून देवनार पशुवधगृह आणि महालक्ष्मी येथे लहान प्राणी व पक्ष्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दहनवाहिनी सुरू करण्यात आली आहे. माननीय उच्च न्यायालयाने, लहान प्राण्यांसाठी दहनवाहिनी कार्यान्वित करण्याबाबत निर्देश दिले होते. या निर्देशांचे पालन करत दोन्ही सुविधा पूर्ण करण्यात आल्या असून त्या दिनांक १ एप्रिल २०२६ पासून वापरासाठी उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे आता बृहन्मुंबई क्षेत्रात शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये स्वतंत्रपणे दहनवाहिन्यांची सुविधा उपलब्ध झाली असून स्थानिकांना यामुळे मदत होईल, असे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी सांगितले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, मुंबई महानगरातील भटके आणि पाळीव श्वानांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर, लहान मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी दहनवाहिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी सांगितले की, दिनांक १ एप्रिल २०२६ पासून देवनार पशुवधगृह आणि महालक्ष्मी स्थित बृहन्मुंबई महानगरपालिका व टाटा ट्रस्ट संचालित प्राण्यांच्या रुग्णालय परिसरात दहनवाहिनी (इन्सिनरेटर) सुरू करण्यात आली आहे. यापैकी देवनार येथील दहनवाहिनीत ५०० किलो वजनापर्यंतचे प्राणी किंवा पक्ष्यांचे अंत्यसंस्कार करता येऊ शकते. ही दहनवाहिनी स्वच्छ व पर्यावरणपूरक असलेल्या पीएनजी इंधनावर चालते. महालक्ष्मी येथील दहनवाहिनीत ५० किलो वजनापर्यंतचे प्राणी किंवा पक्ष्यांचे अंत्यसंस्कार करता येऊ शकते. ही दहनवाहिनी पूर्णत: वीजेवर (इलेक्ट्रीक) आधारित आहे. तर, मालाड येथे सन २०२३ पासून दहनवाहिनी कार्यरत आहे. यामुळे, आता बृहन्मुंबई क्षेत्रात शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे या तीनही भागांत दहनवाहिन्यांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाली आहे, असेही श्रीमती अश्विनी जोशी यांनी सांगितले.
दहनवाहिनी तसेच प्राण्यांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने https://vhd.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तथापि, https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking या लिंकवर नोंदणी करुन, निवडलेल्या विहित वेळेत निवडलेल्या दहनवाहिनीच्या ठिकाणी मृत प्राण्याचे अंत्यविधी करता येतील. तसेच, अधिक माहिती किंवा मदतीसाठी ७५६४९७६६४९ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पशूवैद्यकीय आरोग्य विभाग प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून केले आहे.JS/ML/MS