शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम दिनांक १५ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करावे
मुंबई, दि १६
धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्र, शीव (सायन) रेल्वे उड्डाणपूल, रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे व चुनाभट्टी रेल्वे स्थानकाला भेट देत श्रीमती भिडे यांनी केली पाहणी.
मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने मलजल प्रक्रिया केंद्र अत्यंत महत्त्वपूर्ण असून, जुलै २०२७ पर्यंत धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईल, याची दक्षता घ्यावी. शीव पूर्व – पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम दिनांक १५ जुलै २०२६ पर्यंत पूर्ण करावे. रस्ते काँक्रिटीकरण कामे करताना गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. दिनांक ३० एप्रिल २०२६ नंतर कोणतेही नवीन खोदकाम हाती घेऊ नये. काँक्रिट ओतण्याची कामे दिनांक १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करावी. तसेच, रस्त्यांची सर्व कामे दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करुन रस्ते वाहतुकीस खुले करावेत, असे विविध निर्देश महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी दिले आहेत.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज (दिनांक १६ एप्रिल २०२६) शहर विभागातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यात धारावी येथील ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र, शीव (सायन) येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल, शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे, चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचू नये म्हणून पर्जन्य जलवाहिन्या विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींचा समावेश आहे. या पाहणीवेळी त्यांनी विविध निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यावेळी उपस्थित होते.
धारावी मलजल प्रक्रिया केंद्र
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई मलनिस्सारण प्रकल्प विभागाच्यावतीने धारावी येथे ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे मलजल प्रक्रिया केंद्र (STP) उभारण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. श्रीमती भिडे यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. धारावी मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्पाची भौतिक प्रगती ६५ टक्के झाली आहे. जुलै २०२७ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प सिक्वेन्सियल बॅचिंग रिऍक्टर (SBR) तंत्रज्ञानावर आधारित आहे. अत्यंत कमी जागेत एकापेक्षा अधिक मजल्यांच्या इमारतीमध्ये प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. मुंबई महानगरात एकूण ७ मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू असून धारावी येथील मलजल प्रक्रिया केंद्र सर्वात कमी जागेत बांधले जात आहे.
या प्रकल्प अंतर्गत प्रवेशित सांडपाणी उदंचन केंद्र (Influent Pumping Station), स्लज रूम, सिक्वेन्सियल बॅचिंग रिऍक्टर प्रक्रियेसाठी उभारण्यात येणा-या टाक्या, तृतीयस्तरीय शुद्धीकरण प्रक्रियेची (Tertiary Treatment) इमारत, गाळ प्रक्रिया (Sludge Digester) टाकी, सांडपाणी घेवून येणा-या बोगद्यास जोडलेला शाफ्ट आणि प्रक्रिया केलेले पाणी घेऊन जाणारा शाफ्ट या सर्व घटकांची पाहणी श्रीमती भिडे यांनी केली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणा-या स्थानिक अडचणींचा आढावा घेऊन त्यांचे समाधान करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत जुलै २०२७ मध्ये धारावी मलजल प्रक्रिया केंद्र कार्यान्वित होईल, याची दक्षता बाळगण्याचे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
शीव (सायन) उड्डाणपूल
शीव पूर्व – पश्चिम भागांना जोडणा-या शीव (सायन) रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्प स्थळाची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्यस्थिती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.
रेल्वे विभागाकडून पोलादी तुळया स्थापित करण्याकामी (Girder Launching) १५ दिवसांचा विलंब झाला आहे. अगोदरच्या नियोजनानुसार दिनांक ३० एप्रिल २०२६ पर्यंत तुळया स्थापित करणे अपेक्षित होते. ते काम आता दिनांक १५ मे २०२६ पर्यंत लांबणीवर गेले आहे. पहिली तुळई स्थापित करण्याचे काम लांबणीवर गेले असले तरी इतर अनुषंगिक कामांमध्ये हा विलंब भरून काढावा आणि दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत दोन्ही तुळया स्थापित करण्याची कार्यवाही सुनिश्चित करावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. महानगरपालिका पूल विभाग आणि रेल्वे विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दिनांक १५ जुलै २०२६ पर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण होतील याची खबरदारी घ्यावी, असेदेखील श्रीमती भिडे यांनी सांगितले.
शीव (सायन) येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत दिनांक १३ एप्रिल २०२६ अखेर एकूण १,७३६ रस्त्यांचे मिळून ४९६.८३ किलोमीटर लांबीचे काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत शहर विभागातील शीव येथील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची पाहणी श्रीमती भिडे यांनी केली. शीव पूर्व येथे २७ क्रमांकाच्या रस्त्याच्या मुख्य वाहतुकीच्या भागाचे काँक्रिटीकरण काम आणि रस्ता क्रमांक २५ (सी) येथील पदपथ कामाची त्यांनी पाहणी केली. काँक्रिटीकरण कामे करताना गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. दिनांक ३० एप्रिल २०२६ नंतर कोणतेही खोदकाम हाती घेऊ नये. काँक्रिट ओतण्याची कामे दिनांक १५ मे २०२६ पर्यंत पूर्ण करावी. तसेच, रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करून दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत रस्ते वाहतुकीस खुले करावेत, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
चुनाभट्टी रेल्वे स्थानक
चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात सन २०२४ मध्ये पावसाचे पाणी साचले होते. सन २०२५ मध्ये पावसाळी पाणी साचू नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काही उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे दिनांक १९ ऑगस्ट २०२५ वगळता संपूर्ण पावसाळ्यात एकही दिवस पाणी साचले नाही. या सर्व उपाययोजनांची पाहणी श्रीमती भिडे यांनी केली. हायवे सोसायटीच्या सखल भागात साचणारे पावसाचे पाणी उपसा करून सोमय्या नाल्यात सोडले जाते.तर, रेल्वे हद्दीत उभारलेल्या जल साठवण टाकीमध्ये गोळा झालेले पावसाळी पाणी रहेजा भूखंडाच्या बाजुला असणा-या पर्जन्य जलवाहिनीत सोडले जाते. तेथून हे पाणी डंकन नाल्यास येऊन मिळते. ही संपूर्ण व्यवस्था अधिक कार्यक्षमतेने कार्यान्वित करावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. रेल्वे हद्दीतील टाकीपासून महानगरपालिकेने पाईपलाईन टाकावी, तसेच जल साठवण टाकीतील पाणी उपशाद्वारे सोमय्या नाल्यात सोडावे. त्यामुळे अतिरिक्त फायदा होईल, अशी सूचना रेल्वे अधिका-यांनी केली. रेल्वे आणि महानगरपालिका अधिकाऱयांनी या प्रस्तावाची शक्यता पडताळावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले. चुनाभट्टी रेल्वे स्थानकाच्या बाजूला केंद्रीय श्रम मंत्रालयाची संस्था आहे. या संस्थेच्या हद्दीतून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यास परवानगी मिळावी यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, असेदेखील निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
लघू उपसा केंद्र (Mini Pumping Station)
चुनाभट्टी रेल्वे स्थानकाबाहेर द्रुतगती मार्गालगत लघू उपसा केंद्र (Mini Pumping Station) कार्यरत असून त्याची पाहणी महानगरपालिका आयुक्त श्रीमती भिडे यांनी केली. डंकन नाल्यातून येणारा सर्व प्रवाह येथे उपसा केला जातो. ७०० मीटर अंतरापर्यंत रायझिंग मेन टाकून हा प्रवाह राहुलनगर नाल्यापर्यंत नेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात येणारा पाण्याचा भार कमी होण्यास मदत मिळणार आहे. त्याची व्यवहार्यता तपासावी. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात गुणवत्ता व पारदर्शकता राहावी यासाठी अधिकारी / अभियंत्यांनी आग्रही भूमिका घ्यावी, असे निर्देश श्रीमती भिडे यांनी दिले.
या पाहणी दौ-यास महानगरपालिकेचे उपायुक्त (आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपायुक्त (विशेष) श्री. विनायक विसपुते, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, प्रमुख अभियंता (रस्ते) श्री. मंतय्या स्वामी, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीमती कल्पना राऊळ यांच्यासह संबंधित अधिकारी / अभियंते उपस्थित होते.JS/ML/MS