उद्घाटनानंतरही पुणे-मुंबई लेन एक्सप्रेसवेची लिंक मिसिंगच
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित १३.३ किमी लांबीच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर या प्रकल्पातील मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. मात्र, पुण्याहून मुंबईकडे जाणारी मार्गिका अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या ‘मिसिंग लिंक’वरील मुंबई-पुणे मार्ग सुरू करण्यात आला असला, तरी पुणे-मुंबई मार्ग अद्याप बंद ठेवण्यात आला आहे. उर्वरित तांत्रिक कामे आणि सुरक्षा तपासणी सुरू असल्यामुळे ही मार्गिका अद्याप वाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, बंद असलेल्या मार्गावर अंतिम टप्प्यातील कामे आणि सुरक्षा तपासणी सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत ही लेनही वाहतुकीसाठी खुली केली जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या अंशतः उद्घाटनानंतर अनेक वाहनचालकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. एका युजरने “पुणे-मुंबई मिसिंग लिंक अजूनही ‘मिसिंग’च आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करत प्रत्यक्ष सुरूवातीची स्पष्ट तारीख जाहीर करण्याची मागणी केली.
काही प्रवाशांनी उपरोधिक प्रतिक्रिया देत “मिसिंग लिंकचे उद्घाटन झाले, पण एकाच बाजूची वाहतूक सुरू आणि दुसरीकडे खंडाळा घाटात वाहतूक कोंडी,” असे म्हटले आहे.
पुणे ते मुंबई लेन अद्याप बंद असल्याने वाहनांना सध्या जुन्या घाटमार्गावरून वळवण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
SL/ML/SL