या कारणामुळे तब्बल 54 लाख महिला लाडकी बहिण योजनेतून बाहेर
मुंबई, दि. 2 : नव्या आकडेवारीनुसार, राज्यातील सुमारे 54 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या महिलांना पुढे आर्थिक मदत मिळणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे सुमारे 1 कोटी 89 लाख महिला पात्र ठरल्या असून त्यांना दरमहा नियमानुसार 1500 रुपयांची मदत सुरूच राहणार आहे.
या योजनेचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा होता. अडीच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दरमहा दीड हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात होते. गेल्या दोन वर्षांपासून ही योजना राज्यभरात राबवली जात आहे. त्यामुळे लाखो महिलांना याचा थेट फायदा झाला होता.
मात्र, कालांतराने या योजनेत अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याचे समोर आले. काही ठिकाणी सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनीही या योजनेचा फायदा घेतल्याची प्रकरणे उघड झाली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच सरकारने घालून दिलेल्या अटींचे पालन न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार अशा महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर सरकारने योजनेची सखोल पडताळणी करण्यासाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली. गेल्या दीड वर्षात अनेक टप्प्यांत ही पडताळणी करण्यात आली. केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकारकडून तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, 30 एप्रिलनंतर ही अंतिम मुदतही संपुष्टात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली.