मिसिंग लिंकच्या लोकार्पणात प्रचंड वाहतूक कोंडीचा ताप

 मिसिंग लिंकच्या लोकार्पणात प्रचंड वाहतूक कोंडीचा ताप

मुंबई दि १ : मुंबई पुणे एक्सप्रेस वे दरम्यान नव्याने सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंकचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, मात्र यावेळी पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या ढिसाळ कारभारामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

मिसिंग लिंकच्या लोकार्पणासाठी आजचा मुहूर्त निवडण्यात आला होता. मुहूर्त दुपारी एक वाजताचा होता मात्र पोलीस प्रशासनाने या महामार्गावरील एक लेन सकाळपासूनच बंद करून ठेवली होती. त्यातच तीन दिवसांची सलग सुट्टी आल्यामुळे लोणावळा आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना सुमारे पाच ते सहा तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

या प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार या लिंकचे उद्घाटन काल परवाच करून घेतले असते तर जास्त योग्य झाले असते. तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या फार मोठी असते. हे प्रशासनाला पूर्ण माहित असताना देखील अशा पद्धतीची भूमिका घेतल्याने प्रचंड उन्हाळ्यामध्ये आम्हाला हा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची माफी मागितली यापुढे अशा वाहतूक कोंडी त्यांना अडकावे लागणार नाही अशी ग्वाही देखील दिली. मात्र चहा पेक्षा किटली गरम अशा पद्धतीची भूमिका प्रशासन नेहमी घेत असल्याची भावना अनेक प्रवासी व्यक्त करीत होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *