कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचा मुंबईत महामोर्चा

 कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचा मुंबईत महामोर्चा

मुंबई, दि. 25 : अवकाळी पाऊस, पर्यावरणीय बदल, पडलेले बाजारभाव आणि सरकारचे दुर्लक्ष वर्षांनुवर्षे नुकसान सहन करणारे कोकणातील आंबा -काजू बागातदार यंदा प्रथमच आपल्या मागण्या मांडण्यासाठी मुंबईत महामोर्चा काढणार आहेत. येत्या १५ मे रोजी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानापर्यंत एक भव्य धडक मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा-काजू बागायतदारांचा हा आक्रोश आता थेट सत्तेच्या दारापर्यंत पोहोचणार आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडल्यानंतर, आता शेट्टी यांनी कोकणातील बागायतदारांच्या समस्या हाती घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनाला राजकीय बळही लाभले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) या मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवणार आहे. यामुळे या आंदोलनाची व्याप्ती वाढली असून, कोकण पट्ट्यातील हजारो शेतकरी या ऐतिहासिक मोर्चासाठी मुंबईत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या संघर्षाला आता वाचा फुटणार आहे. राज्य सरकारने आंबा उत्पादकांसाठी जाहीर केलेली तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याची घणाघाती टीका शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

राज्य सरकारने प्रति हेक्टरी अवघी २२ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. यावर तीव्र संताप व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “हजारो रुपयांचे भांडवल लावून वर्षभर कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या हातात २२ हजार रुपये टेकवणे, हा त्यांचा अपमान आहे. हे सरकार केवळ घोषणाबाजी करण्यात धन्यता मानत असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या झोळीत मात्र निराशाच पडत आहे.”

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *