अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन
मुंबई, दि. १६ : मान्सून भारतात दाखल असल्याची आनंदवार्ता IMD ने दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वेळेआधीच मान्सूनने अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अंदमान, निकोबार बेटांसह, बंगालचा उपसागर आणि आग्नेय अरबी समुद्रात मॉन्सून दाखल झाला आहे.
नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य आणि आग्नेय भाग, अंदमान समुद्राचा मोठा भाग, संपूर्ण निकोबार बेटे आणि श्री विजयपुरम परिसर व्यापला आहे. आता आगामी काळात तो संपूर्ण भारतभर पसरणार आहे. सध्या मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
मान्सूनच्या आगमनाची घोषणा करताना हवामान विभागाने सांगितले की, सध्याची हवामान परिस्थिती आणि मान्सूनची हालचाल अनुकूल राहिल्यास, मान्सून केरळमध्ये नेहमीच्या तारखेपूर्वी पोहोचू शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर हळूहळू देशाच्या इतर भागांत पुढे सरकतो. मात्र, IMD ने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, यंदा नैऋत्य मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं सुरू होईल. जूनच्या पहिल्या आठवड्याच्या मान्सून दक्षिण कोकणामध्ये दाखल होईल. नंतर हळूहळू आसपास विदर्भासह मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
20 मे च्या सुमारास अंदमानात पोहोचणारा पाऊस यंदा तब्बल पाच दिवस आधीच, म्हणजेच 16 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे.