२६ लाख कोटींच्या टाटा साम्राज्याचा नवा उत्तराधिकारी कोण?

 २६ लाख कोटींच्या टाटा साम्राज्याचा नवा उत्तराधिकारी कोण?

नोएल टाटा नोव्हेंबरमध्ये पूर्ण करणार वयाची ७० वर्षे; टाटा समूह कंपन्यांच्या संचालक मंडळावरून होणार निवृत्त

मुंबई दि १७ : टाटा समूहाचे उत्तराधिकारी नोएल टाटा या वर्षी नोव्हेंबर २०२६ मध्ये वयाची ७० वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे, समूहातील विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावरून त्यांच्या निवृत्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. टाटा समूहाच्या दीर्घकालीन अंतर्गत नियमांनुसार, कोणताही कार्यकारी अधिकारी वयाच्या ६५ व्या वर्षी आणि बिगर-कार्यकारी संचालक वयाच्या ७० व्या वर्षी पदावरून निवृत्त होतो. यामुळे सुमारे २६.३ लाख कोटी रुपयये (३६५ बिलियन डॉलर्स) च्या अवाढव्य टाटा साम्राज्यातील अनेक प्रमुख कंपन्यांचे नेतृत्व आता आगामी काळात कोणाकडे जाणार, याविषयीची चर्चा कॉर्पोरेट वर्तुळात वेगाने सुरू झाली आहे.

ट्रेन्ट आणि व्होल्टाससह अनेक कंपन्यांमध्ये बदलांचे संकेत मिळू लागले आहेत. नोएल टाटा सध्या ट्रेन्ट, व्होल्टास, टाटा इंटरनॅशनल आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांचे चेअरमन आहेत. टायटन आणि टाटा स्टीलचे व्हाइस चेअरमन म्हणूनही ते काम पाहत आहेत. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली ट्रेन्ट आणि व्होल्टाससारख्या ग्राहक-केंद्रित कंपन्यांनी बाजारात अभूतपूर्व यश मिळवले आहे. दरम्यान, ही निवृत्ती केवळ टाटा समूहाच्या व्यावसायिक कंपन्यांच्या संचालक मंडळापुरती मर्यादित असेल. टाटा सन्समध्ये ६६ टक्के मालकी हक्क असलेल्या ‘टाटा ट्रस्ट्स’च्या सर्वोच्च अध्यक्षपदावर मात्र नोएल टाटा कायम राहतील; कारण ट्रस्टच्या नियमावलीनुसार अध्यक्षांसाठी वयोमर्यादेची कोणतीही अट नसते.

भावी नेतृत्वाची चर्चा आणि पुढील पिढीवर लक्ष

नोएल टाटा यांच्या जागी विविध कंपन्यांच्या चेअरमन पदावर कोणाची नियुक्ती होणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संभाव्य नावांवर चर्चा सुरू आहे. या मोठ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाच्या पुढील पिढीतील सदस्य म्हणजेच नेव्हिल टाटा, लीया टाटा आणि माया टाटा यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अलीकडेच नेव्हिल टाटा यांची ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’मध्ये विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा समूहाच्या अनेक कंपन्या आगामी काळात मोठी भांडवली गुंतवणूक आणि विस्ताराच्या योजना आखत आहेत. त्यामुळे, व्यवसायातील सातत्य आणि स्थिरता राखण्यासाठी नेतृत्वबदल अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडला जात आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *