३० मे पासून मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण
मुंबई, दि. १६ : मराठा आरक्षण प्रश्नाबाबत आजवर अनेकदा उपोषणाचे हत्यार उपसणारे मनोज जरांगे हे आता 30 मे पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. राज्य सरकारने 29 मे पर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. अन्यथा 30 मे पासून आमरण उपोषण करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारने सातारा संस्थानच्या गॅझेटचा जीआर काढू असे सरकारने सांगितले होते पण तसे काही केले नाही, आंदोलन केल्याशिवाय सरकार काही ऐकत नाही. हैदराबाद गॅझेटनुसार 308 का असेना नोंदी निघाल्या ना? अधिकारी सांगतात सरकारने आदेश दिले नाही, मग काय आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर सरकार आदेश देणार का? असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
जरांगे यांनी म्हटले आहे की, माझे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाईट मत नाही. पण माझ्या समाजाचे वाटोळे होणार असेल तर मी तुम्हाला कोणालाच मोजणार नाही. मला मित्र नको, मंत्र्यांशी संबंध नको मला केवळ माझ्या समाजाचे लेकरं मोठी करायची आहेत. मी फडणवीस यांना दोष देत नाही माझं म्हणणं केवळ इतके आहे की हैदराबादचा जीआर काढला पण प्रमाणपत्र रोखले का नाही? ते आता बंद कसे झाले? तुम्हाला मुख्यमंत्री मराठ्यांनीच केले आहे हे लक्षात ठेवा, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 30 तारखेपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. 30 मे पूर्वी सर्वांना प्रमाणपत्र द्यावे, नाही तर 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान जरांगे यांनी या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका देखील केली आहे. या सर्व घडामोडींनंतर आता राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता मनोज जरांगे काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “मी पदाला चिकटून बसणाऱ्यांपैकी नाही. उपसमितीच्या अध्यक्षपदाचा माझा राजीनामा दिल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत असेल, तर मी राजीनामा द्यायलाही तयार आहे”, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे.
SL/ML/SL