भांडुपमध्ये नागरी समस्यांचा स्फोट; महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर सभागृहात जोरदार हल्ला

 भांडुपमध्ये नागरी समस्यांचा स्फोट; महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर सभागृहात जोरदार हल्ला

मुंबई, दि. २३ – भांडुपसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या भागात एकीकडे टोलेजंग इमारती उभ्या राहत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध गंभीर मुद्दे शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी ठामपणे मांडले.

झोपडपट्टीबहुल भागात आजही सुसज्ज सीवरेज लाईन उपलब्ध नसल्याने नागरिकांना अस्वच्छता, आरोग्य धोके व दैनंदिन जीवनातील अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे प्रभाग क्र.११४ च्या ठाकरे पक्षाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले.वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत मूलभूत सुविधा पुरवण्यात महानगरपालिका अपयशी ठरत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. याशिवाय, प्रभागात एकही सरकारी रुग्णालय नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना महागड्या खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, झोपडपट्टीतील कुटुंबांवर आर्थिक ताण वाढत आहे. सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृहात राजोल पाटील यांनी केली.

डम्पिंग ग्राउंड परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही अत्यंत गंभीर बनला असून, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डम्पिंग ग्राउंड मुंबईबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. तसेच, डोंगराळ भागातील पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित करत “मुंबईला पाणीपुरवठा करणारे केंद्र शेजारी असतानाही स्थानिक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही,” ही विसंगती सभागृहाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. नागरिकांना नियमित, पुरेसा आणि न्याय्य पाणीपुरवठा मिळावा, यासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे राजोल पाटील यांनी स्पष्ट केले. एकूणच, भांडुपमधील सीवरेज, आरोग्यसेवा, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा या मूलभूत प्रश्नांकडे महानगरपालिकेने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे अधोरेखित करत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *