दाते पंचांगानुसार यंदा वरुणराजाची कृपा;
८ जूनपासून पावसाचे आगमन
मुंबई दि २७ :- देशातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू मानले जाणारे दाते पंचांगकर्ते यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणारी माहिती दिली आहे. त्यांच्या अंदाजानुसार यंदा सरासरी इतका पाऊस पडेल. भेंडवळीच्या घट मांडणीचा अंदाज ही दमदार पावसाचा आहे. एल निनोमुळे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे तर भेंडवळीच्या घट मांडणीने ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये महापुराच्या स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
दाते पंचांगकर्ते यांचा अंदाज
१४ मेच्या ऋतुउत्तेजक रवि बुध युतीमुळे मान्सूनपूर्व वळवाचा पाऊस होण्यास वातावरण पोषक होईल. केरळमध्ये मान्सूनचे आगमन वेळेवर होईल आणि महाराष्ट्रात ८ ते १० जूनच्या सुमारास पाऊस सुरु होईल. १५ जून ते १२ ऑगस्ट महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल. १७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर उत्तर भारत व उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मोठी पर्जन्यवृष्टी होईल. ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होईल, दक्षिण भारतामध्ये परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत होईल.
८ जून २०२६ रोजी सोमवारी १३ वाजून ३३ मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्यावेळी कन्या लग्न असून वायुमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन बेडूक असून गुरु व शुक्र हे जलनाडीत आहेत. १४ मे च्या रवि- बुध युतीचा परिणाम आणि ९ जूनच्या गुरु शुक्र युतीचा विचार करता या नक्षत्रात पर्जन्यवृष्टी चांगली होईल. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत होईल. जून ८, ९, १४ ते १८ पाऊस अपेक्षित.
आर्द्रा नक्षत्र
२२ जून २०२६ रोजी सोमवारी दुपारी १२:२६ वाजता सूर्याचे आर्द्रा नक्षत्र सुरु होत आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून प्रवेश वेळी कन्या लग्न आणि वायुमंडल योग आहे. बुध, गुरु, शुक्र हे जलनाडीत आहेत. एकंदरीत ग्रहस्थिती पाहता पूर्वार्धात बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित आहे. उत्तरार्धात पाऊस ओढ धरेल. जून २२, २३, २५, २६, २९ पाऊस अपेक्षित.
पुनर्वसु नक्षत्र
६ जुलै २०२६ रोजी सोमवारी दुपारी १२:०३ वाजता सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश समयी कन्या लग्न उदित असून वायुमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून रवि, बुध, गुरु व शुक्र हे जलनाडीत आहेत. या नक्षत्राच्या कालावधीत १३ जुलैच्या रवि बुध युतीमुळे पर्जन्याचे प्रमाण चांगले राहील. उत्तरार्धात १४ जुलै नंतर समाधान कारक पाऊस होईल. नद्या व धरणे यांच्या पाणी पातळीत वाढ होईल. जुलै ६, ७, १३, १४, १५, १८, १९ पाऊस अपेक्षित.
पुष्य नक्षत्र
२० जुलै २०२६ रोजी सोमवारी सकाळी ११ वाजून २८ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर असून प्रवेश वेळी कन्या लग्न आणि वायुमंडल योग आहे. रवि, बुध, गुरु व शुक्र हे जलनाडीत आहेत. १३ जुलैची झालेली ऋतुउत्तेजक रवि बुध युति आणि २९ जुलैच्या रवि- गुरु युतीमुळे या नक्षत्राचा पाऊस सर्वत्र आणि चांगला होईल. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. जुलै २४, २५, २९, ३०, ३१ आणि ऑगस्ट १ पाऊस अपेक्षित.
आश्लेषा नक्षत्र
३ ऑगस्ट २०२६ रोजी सोमवारी सकाळी १०:२४ वाजता सूर्य आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्यावेळी कन्या लग्न उदित असून वायुमंडल योग आहे. पर्जन्यसूचक हत्ती हे वाहन असून रवि, बुध, गुरु व शुक्र हे जलनाडीत आहेत. २९ जुलै रोजी झालेल्या रवि गुरु युतीचा परिणाम म्हणून या नक्षत्रात समाधान कारक पाऊस होईल. ऑगस्ट ३, ४, १० ते १५ पाऊस अपेक्षित.
मघा नक्षत्र
१७ ऑगस्ट २०२६ रोजी सोमवारी सकाळी ७:५८ वाजता सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. पर्जन्य सूचक मोर हे वाहन असून प्रवेश समयी सिंहलग्न आणि अग्निमंडल योग आहे. रवि, बुध, गुरु हे जलनाडीत आहेत. १५ ऑगस्ट रोजीच्या बुध – गुरु युतीचा विचार करता या नक्षत्रात पाऊस खंडीत होईल, मात्र काही भागात पावसाचे प्रमाण दमदार असेल, नैसर्गिक आपत्ती संभवते. उत्तर भारत, विदर्भ, मराठवाडा, सोलापूर या भागात मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळीत होईल. ऑगस्ट २५ ते २९ पाऊस अपेक्षित.
पूर्वा नक्षत्र
३० ऑगस्ट २०२६ रोजी रविवारी उत्तररात्री २७:५८ वाजता (म्हणजे सोमवारी पहाटे ३:५८ वाजता) सूर्य पूर्वा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी कर्क लग्न व अग्निमंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून रवि, बुध, गुरु हे जलनाडीत आहेत. २७ ऑगस्ट रोजी होणारी रवि बुध युति आणि ग्रहस्थिती पाहता या नक्षत्राचा पाऊस मध्यम प्रमाणात होईल दक्षिण महाराष्ट्रात बऱ्यापैकी होईल. सप्टेंबर ४, ५, ६, ९ ते १२ पाऊस अपेक्षित.
उत्तरा नक्षत्र
१३ सप्टेंबर २०२६ रोजी रविवारी रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी उत्तरा नक्षत्रात सूर्य प्रवेश करीत आहे. प्रवेश वेळी मेष लग्न आणि अग्निमंडल योग आहे. पर्जन्य सूचक बेडूक हे वाहन असून रवि आणि गुरु हे जलनाडीत आहेत. १८ सप्टेंबरच्या बुध शनि प्रतियुतीचा विचार करता उष्णतामान वाढेल आणि पाऊसही बऱ्यापैकी होईल. उत्तर भारत, विदर्भ, मराठवाडा, सोलापूर या भागात मोठ्या पावसाने जनजीवन विस्कळीत होईल. सप्टेंबर १९ ते २४ पाऊस अपेक्षित.
हस्त नक्षत्र
२७ सप्टेंबर २०२६ रोजी ३.१९ वाजता सूर्याचे हस्त नक्षत्र सुरु होत आहे. त्यावेळी धनु लग्न उदित असून वरुणमंडल योग होत आहे. या नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. रवि, मंगळ, गुरु हे जलनाडीत आहेत. ४ अक्टोबरची रवि – शनि प्रतियुति आणि ६ अक्टोबरची बुध शुक्र युति यामुळे पाऊस खंडीत होईल. मात्र काही भागात हस्ताच्या सरी मोठ्या प्रमाणात होतील. सप्टेंबर २७, २८, २९ अक्टोबर ४ ते ७ पाऊस अपेक्षित.
चित्रा नक्षत्र
१० अक्टोबर २०२६ रोजी शनिवारी उत्तररात्री २६:२० वाजता (म्हणजे रविवारी पहाटे २:२० वाजता) सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा आहे. प्रवेश वेळी कर्क लग्न उदित असून वरुणमंडल योग होत आहे. मंगळ आणि गुरु हे जलनाडीत आहेत. मागील नक्षत्रापेक्षा या नक्षत्रात पर्जन्यमान थोडे सुधारलेले असेल. मात्र पाऊस समाधान कारक नसेल. अक्टोबर १०, ११, १९ ते २२ पाऊस अपेक्षित.
स्वाती नक्षत्र
२४ अक्टोबर २०२६ रोजी शनिवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सूर्य स्वाती नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्यावेळी मकर लग्न आणि इंद्रमंडल योग आहे. वाहन बेडूक असून मंगळ आणि गुरु हे जलनाडीत आहेत. २४ ऑक्टोबरची रवि शुक्र युति आणि ४ नोव्हेंबरची रवि बुध युति यामुळे या नक्षत्रात नक्षत्रात पर्जन्यवृष्टीचे योग आहेत. काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता क्यता आहे. ऑक्टोबर २४, २५, ३१ नोव्हेंबर १ ते ४ पाऊस अपेक्षित.
एकूण दाते पंचांगकर्ते यांनी यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील दमदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी दाते पंचांगकर्त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.ML/ML/MS