संजय डहाळे, दिलीप ठाकूर, विजय पडकिल आणि पल्लवी वायंगणकर यांना प्रतिष्ठेचे पुरस्कार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते प्रदान.
मुंबई, दि.२७ : बोरीवली पूर्व येथील गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी सांगता करण्यात आली. यावेळी उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, जय महाराष्ट्र नगराचे भाग्यविधाते विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे गेल्या शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ पासून आयोजन करण्यात आले होते.
माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेला पहिला विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्य समीक्षक संजय डहाळे यांना, जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांना, प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्स क्लबच्या आधारस्तंभ पल्लवी राकेश वायंगणकर यांना, जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते विजय पडकिल यांना माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी गोपाळ शेट्टी यांनी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे तसेच या व्याख्यानमालेचे संस्थापक विजय वैद्य यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतांनाच त्यांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या वैशाली विजय वैद्य यांना सादर प्रणामही केला.
या वसंत व्याख्यानमालेतर्फे युवकांना एकत्रित आणून त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत, अशी सूचना केली. आपण या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या सदैव पाठीशी राहू, असे सुस्पष्ट अभिवचन दिले. सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे, श्रेयसी मंत्रवादी, अर्चना गोरे यांच्या ‘कितीदा नव्याने …’ या सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व मुंबई येथे सायंकाळी साडेसात वाजतां या कार्यक्रमाने जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची सांगता झाली.
या कार्यक्रमाचे समयोचित सूत्रसंचालन प्रा. नयना रेगे यांनी अणि मानपत्रांचे वाचन सचिन वगळ यांनी केले. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सरचिटणीस दिपक भातुसे, उत्तर मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक घोडे, साहित्यिक विजय तारी, मीना इंगळे, मागाठाणे मित्र मंडळाचे पदाधिकारी मनोज सनान्से, हेमंत पाटकर, सुभाष देसाई, रसिका वारंग आदी मान्यवर उपस्थित होते.ML/ML/MS