आता 21 जूनला होणार NEET ची पुनर्परीक्षा
नवी दिल्ली, दि. १५ : NTA कडून ३ मे ला देशभर घेण्यात आलेली UG : NEET परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आल्यानंतर देशभरातील २२ लाखांहून अधिक परिक्षांर्थी चिंतेत पडले होते. आता पुन्हा नव्या जोमाने तयारी करावी लागणार असल्याने विद्यार्थी, पालक आतुरतेने परीक्षेचा नवीन वेळापत्रकाची वाट पाहत होते. ही परीक्षा आता २१ जून ला होणार असल्याचे NTA कडून जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान NEET परीक्षेतील या गैरव्यवहाराचा तपास CBIकडे सोपवण्यात आला असून त्यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. सरकारच्या सर्व विभागांचा या तपास मोहिमेत सहभाग असेल. “येणाऱ्या फेरपरीक्षेत कोणताही गैरव्यवहार होणार नाही,” असा विश्वास केंद्री शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्याची मेडिकल सीट गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळू दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, पुढील वर्षापासून (२०२७) नीटची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल आणि यावर्षी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.