खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याचे न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली, दि. 21 : स्वातंत्र्योत्तर भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने केंद्र सरकारला याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. 4 मे 2026 पूर्वी सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आदेश देत न्यायालयाने या प्रकरणात स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे 74 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सन्मानाला अखेर न्याय मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
या प्रकरणी ‘कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशन’च्या वतीने नोव्हेंबर 2025 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारच्या विलंबित भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. इतक्या मोठ्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात झालेला उशीर योग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने तातडीने निर्णय घेण्याचे आदेश दिले. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळेच हा सन्मान इतकी वर्षे रखडल्याचे निरीक्षणही नोंदवण्यात आले.
खाशाबा जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी दीर्घ संघर्ष केला आहे. विशेषतः त्यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. खाशाबा जाधव हे भारतीय कुस्ती इतिहासातील एक महत्त्वाचे नाव आहे. 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील गोलेश्वर येथे त्यांचा जन्म झाला.
SL/ML/SL