युद्धखोर पंतप्रधान नेत्यानाहूविरोधात इस्त्रायलमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर
जेरुसलाम, दि. २७ : इराण, लेबनॉन आणि हमास अशा तीन आघाड्यांवर युद्ध लढणाऱ्या इस्रायलच्या जनतेमध्ये असंतोष वाढत चालला आहे. पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांच्या युद्धखोरीविरोधात संताप व्यक्त करत हजारो नागरिक दोन दिवसांपासून तेल अवीवसह अनेक शहरांत रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. या आंदोलनात न्यायव्यवस्थेचे संरक्षण, पोलिसांच्या गैरवर्तनाविरोधात आवाज आणि नाहू यांच्या राजीनाम्याची मागणी ठळकपणे झाली.
इस्रायलच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात नरसंहाराचा खटला सुरू आहे. तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने नेतन्याहू यांना युद्ध गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. जगभरातून इस्रायलवर टीका होत आहे. त्यामुळेदेखील इस्रायली जनतेत रोष आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी ‘मूव्हमेंट फॉर क्वॉलिटी गव्हर्नमेंट -अँटी करप्शन वॉचडॉग’ या संघटनेने निषेध आंदोलनाची हाक दिली होती. इतर सामाजिक संघटनाही यात सहभागी झाल्या. तेल अवीवच्या हबिमा चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली. हजारो लोकांनी येथे जमून घोषणाबाजी केली. जेरुसलम, हैफासह देशाच्या इतर शहरांतही हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. गाझा पट्टीतील नागरिकांवर व युद्धपैद्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधातही या वेळी आवाज उठवण्यात आला.
हजारो नागरिक रस्त्यावर उतरताच दोन माजी पंतप्रधांनांची सुद्धा एकजूट केली आहे. इस्रायलचे दोन माजी पंतप्रधान, नफ्ताली बेनेट आणि यायर लॅपिड यांनी विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या नेतान्याहू यांना सत्तेवरून हटवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
नेतान्याहू यांचे 12 वर्षांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी त्यांनी यापूर्वी 2021 मध्ये वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांना एकत्र करून आघाडी केली होती. आता, या दोन नेत्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपापले पक्ष विलीन करून ‘टुगेदर’ नावाचा एक नवीन पक्ष स्थापन केला आहे.
दरम्यान इस्रायली नागरिकही आता सततच्या युद्धामुळे मानसिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या थकले आहेत. लष्करी सेवेतून पळवाट काढणारे रिझर्व्हिस्ट, सततच्या हवाई हल्ल्यांच्या इशाऱ्यांमुळे विस्कळीत झालेले दैनंदिन जीवन, आणि निर्णायक विजय न मिळाल्यामुळे वाढलेली नाराजी हे ‘युद्ध थकवा’चे ठोस उदाहरण आहेत. इराणविरुद्धच्या युद्धामुळे सार्वजनिक वाहतूक कमी झाली आहे, बससेवा कमी झाल्याने कामावर जाणे कठीण झाले आहे. सामाजिक कार्यक्रम, कुटुंबीय भेटी यावर परिणाम झाला आहे. सततच्या सायरन आणि हवाई हल्ल्यांच्या इशाऱ्यांमुळे रात्रीची झोप विस्कळीत होते, नागरिक मानसिकदृष्ट्या थकले आहेत. नेत्यानाहूंविरोधात आता नागरिक टुगेगर या पक्षाला पाठींबा देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
SL/ML/SL