हे महिला आरक्षण बिल नाही, देशाचा नकाशा बदलण्याचा राजकीय कट
नवी दिल्ली, दि. १७ : देशात महिला आरक्षण कायदा लागू झाला आहे. संसदेत यावर मध्यरात्रीपर्यंत चर्चा सुरु होती. या दरम्यान कायदा मंत्रालयानं विधेयक लागू करत असल्याचं नोटिफिकेशन जारी केलं. कायदा लागू झालेला असताना यासंदर्भातील तीन विधेयकांवर लोकसभेत चर्चा सुरु आहे. याबाबत काल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सरकारला धारेवर धरले होते. तर आज विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टिका केली. “हे महिला आरक्षण बिल नसून, भारताचा निवडणूक नकाशा बदलण्याचा एक राजकीय कट आहे,” अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली. 2023 मध्येच हे विधेयक मंजूर झाले असताना त्याची अंमलबजावणी अद्याप का रखडली आहे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला. त्यांनी यावेळी सरकारला धारेवर धरत भाजपची कोंडी केली. त्यामुळे काही वेळ लोकसभेत तणाव आणि गोंधळ निर्माण झाला होता.
राहुल गांधींनी स्पष्ट केले की, देशाच्या लोकशाही रचनेत ढवळाढवळ करणे हे देशविरोधी आहे आणि काँग्रेस तसे होऊ देणार नाही. “आसाम आणि काश्मीरमध्ये जे केले, तेच आता पूर्ण देशात करण्याचा तुमचा विचार आहे. पण आम्ही तसे होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. या चर्चेने संसदेतील वातावरण चांगलेच तापले होते.
राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, हे विधेयक म्हणजे जाती जनगणनेच्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे. “तुम्ही ओबीसी आणि दलितांना हिंदू म्हणता, पण उद्योग, न्यायपालिका आणि खाजगी क्षेत्रात त्यांना स्थान कुठे आहे? हे विधेयक म्हणजे राज्यघटनेपेक्षा मनुवादाला महत्त्व देण्याचा प्रकार आहे,” असा आरोप त्यांनी केला. आसाम आणि जम्मू-काश्मीरप्रमाणे आता सत्ता राखण्यासाठी संविधानात बदल करून देशाचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
“महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली सरकार देशातील ओबीसी आणि दलित समाजाची सत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे,” असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. या विधेयकाच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबावरून त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. राहुल गांधी म्हणाले की, भारतीय समाजात स्त्रियांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. “माझ्या आईने आणि बहिणीने मला खूप काही शिकवले आहे. माझी बहीण प्रियंकाने काल संसदेत जे भाषण केले, त्याने वातावरण हलके केले,” असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चिमटा काढला. मात्र, त्याच वेळी त्यांनी गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले. “देशातील ओबीसी आणि दलित भगिनींना प्रतिनिधित्व देण्याऐवजी त्यांच्याकडून हक्क काढून घेण्याचा हा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.
SL/ML/SL