६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर
मुंबई, दि. ७ : इराणच्या भीषण युद्धाचे चटके आता सर्वसामान्य भारतीयांनाही सहन करावे लागणार आहेत. आज (दि. ७ मार्च) पासून देशभरात घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीचा परिणाम घरगुती ग्राहकांसोबतच हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि छोट्या व्यवसायांवरही होणार आहे. एप्रिल २०२५ पासून गॅसचे दर स्थिर होते, पण आजच्या या दरवाढीने एका झटक्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे.
या प्रचंड दरवाढीच्या पार्श्वभूमीवर देशातील इंधन पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात ऊर्जा टंचाई नसल्याचे स्पष्ट केले आहे.
“नागरिकांना परवडणारे आणि शाश्वत इंधन उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. भारतात ऊर्जेची कोणतीही कमतरता नाही आणि ग्राहकांनी चिंता करण्याचे कारण नाही,” असे त्यांनी ‘X’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याच्या सोशल मीडियावरील अफवा फेटाळल्या आहेत.
कंपनीच्या निवेदनानुसार, देशात पुरेसा इंधन साठा उपलब्ध असून पुरवठा आणि वितरण व्यवस्था सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये आणि अधिकृत स्त्रोतांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
SL/ML/SL