होळीसाठी लोकलच्या दाराला झाड बांधून नेणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

 होळीसाठी लोकलच्या दाराला झाड बांधून नेणाऱ्या ६ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई, दि. ४ : परंपरागत पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी विरारमधील काही रहिवासी माहीमकडे लोकलने जात होते. या प्रवासादरम्यान त्यांनी लोकलच्या दरवाजाला सुपारीच्या झाडाचा खांब आडव्या स्थितीत बांधला होता. ज्याच्या झावळ्या दरवाज्यात लोंबकळत होत्या. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढताना-उतरताना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या प्रकाराची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाला मिळताच तात्काळ कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी रात्री सुमारे ११.४० वाजता विरार-चर्चगेट लोकल बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर आली असता तेथे कर्तव्यावर असलेल्या स्थानक व्यवस्थापकांनी डब्याची पाहणी केली. त्यावेळी काही व्यक्तींनी डब्याच्या दरवाजाला झाड बांधल्याचे आढळून आले.

या प्रकारामुळे रात्री १२.२४ ते १२.४६ दरम्यान सुमारे २० मिनिटे लोकल सेवेवर परिणाम झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. संबंधित प्रवाशांना लोकलमधून उतरवून त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कार्यालयात नेण्यात आले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *