सुवेंदू अधिकारी होणार प. बंगालचे नवे मुख्यमंत्री
कोलकाता, दि. ८ : पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक राजकीय बदल घडला असून भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. ते उद्या (९ मे ) कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंड येथे शपथ घेणार आहेत.सुवेंदू यांनी लोक भवन येथे राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. उद्या सकाळी ११ वाजता कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर सुवेंदू मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्यासह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
विधानसभेच्या बैठकीला संबोधित करताना शाह म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत गुन्हेगार राजकारणी बनले आहेत, त्यामुळे विकासाला वावच उरलेला नाही. आम्ही घुसखोरी, हिंसाचार संपवू आणि लाचखोरी बंद करू. महिलांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असेल.५६ वर्षीय सुवेंदू यांनी भवानीपूरमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्यांनी नंदीग्राम मतदारसंघही सलग दुसऱ्यांदा जिंकला, जिथे त्यांनी २०२१ मध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने २०७ जागा जिंकल्या.